Maharashtra Assembly Elections 2024: नाशिकमध्ये भाजपपाठोपाठ आता शिवसेना शिंदे गटालाही गळती लागली आहे. उद्धव ठाकरेंचे सचिव मिलिंद नार्वेंकरावर गंभीर आरोप करून घोलप यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती.
शिर्डी लोकसभेच्या उमेदवारीवरून नाराज झालेले शिवसेना (उबाठा) उपनेते माजी मंत्री बबनराव घोलप यांनी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर एप्रिलमध्ये ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांनी शिंदे गटात प्रवेश करीत घोलप यांनी शिवसेना शिंदे गटाचे काम सुरू केले होते. घोलप यांचा मुलगा व माजी आमदार योगेश घोलप यांनी मात्र उबाठा गटात थांबणे पसंत केले होते. त्यामुळे बबनराव घोलप यांनी शिंदेसेनेचा, तर योगेश घोलप यांनी उबाठा गटाचा लोकसभेला प्रचार केला होता. परंतु, पुत्र योगेश घोलप यांच्यासाठी त्यांनी शिंदे गटाचा त्याग करण्याचे सूतोवाच गेल्या आठवड्यात केले होते. देवळाली विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला जाणार असल्याचे लक्षात आल्यानंतर घोलपांनी गेल्या आठवड्यात शरद पवारांची भेट घेतली होती. परंतु, ही जागा आता उबाठाकडे गेली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी घोलपांनी पुत्रासाठी घरवापसी केल्याचे चित्र आहे.
देवळाली मतदारसंघात घोलप यांचे पुत्र योगेश यांना उबाठाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर घोलप यांनी तडकाफडकी शिंदेसेनेचा राजीनामा दिला आहे. शिंदेसेनेत प्रवेश करताना घोलप यांना चर्मकार महामंडळाचे अध्यक्षपद देण्यासह समाजाच्या काही मागण्या, तसेच मतदारसंघातील विकासकामांचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, यातील एकाही आश्वासनाची पूर्ती झाली नसल्याने आणि उद्धव ठाकरेंनी पुत्राला उमेदवारी देऊन माझ्यावर मोठे उपकार केले असल्याचे सांगत, पक्षाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी शिंदे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर येथे शिंदेसेनेला मोठा धक्का बसला आहे.
अहिरे विरुद्ध घोलप लढत
देवळालीच्या जागेवरून महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि उबाठा गटात रस्सीखेच सुरू होती. २०१४ मध्ये ही जागा शिवसेनेकडे होती. परंतु,२०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे यांनी योगेश घोलप यांचा पराभव केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीचा आमदार असल्याने शरद पवार गटाने दावा केला होता. शरद पवार गटाकडे जवळपास २१ इच्छुकांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, आता जागावाटपात उबाठाची या ठिकाणी सरशी झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा घोलप विरुद्ध सरोज अहिरे यांच्यात सामना रंगणार असल्याचे चित्र आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समाज आणि मतदारसंघाच्या विकासासाठी मला दिलेले आश्वासन पाळले नाही. उबाठाकडून मुलाला उमेदवारी देऊन माझ्यावर मोठे उपकार केले आहेत. त्यामुळे पक्षाचा राजीनामा दिला आहे.– बबनराव घोलप, माजी मंत्री