Bhavana Gawali Vs Anantrao Deshmukh: वाशिमच्या रिसोड मतदारसंघात महायुतीत पेच निर्माण झाला आहे. येथे शिंदेसेनेविरोधात भाजप नेत्याने दंड थोपटले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे.
रिसोड विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड मानला जातो. या मतदारसंघावर झनक घराण्याचे वर्चस्व आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अमित झनक इथून सलग तीनवेळा निवडून आले आहेत. त्यापूर्वी त्यांचे वडील स्वर्गीय सुभाष झनक आणि आजोबा स्वर्गीय रामराव झनक यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे या मतदार संघावर झनक घराण्याची मोठी पकड असून मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे.
रिसोड विधासभा मतदारसंघ हा आमदार भावना गवळी यांचं होम ग्राउंड आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांची उमेदवारी कापल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गवळी यांना विधान परिषदेवर आमदार केलं. मात्र, आता त्या विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेकडून त्यांची उमेदवारी निश्चित केल्याचं त्यांच्याकडून सांगितल्या जात आहे.
तर, माजी मंत्री अनंतराव देशमुख हे सुद्धा भाजपकडून उमेदवारी निश्चित झाली असल्याने सोमवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. अनंतराव देशमुख हे मूळ काँग्रेसचे मात्र काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळत नसल्याने त्यांनी गेल्यावर्षी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून उमेदवारी मिळेल या आशेवर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता भाजपने त्यांना उमेदवारी दिली आणि ते नामांकन अर्ज दाखल करणार असल्याची चर्चा सुरू झाली.
Washim News: वाशिममध्ये महायुतीत संघर्ष, भावना गवळी विरुद्ध अनंतराव देशमुख, मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता?
या मतदारसंघात भाजप आणि शिंदेसेनेकडून अजूनही उमेदवारांची अधिकृत घोषणा झाली नसली, तरी शिंदेसेनेकडून आमदार भावना गवळी आणि भाजपकडून अनंतराव देशमुख हे उमेदवारी अर्ज भरणार असल्याच्या चर्चेमुळे इथे महायुतीत मैत्रीपूर्ण लढत झाल्यास मैत्रीपूर्ण लढत होणारा महाराष्ट्रातील हा पहिला मतदार संघ ठरणार आहे.