Washim Vidhan Sabha Nivadnuk : भाजपने वाशिममध्ये सलग तीन टर्म आमदार असलेल्या लखन मलिक यांचं तिकीट कापलं असून त्यांच्या जागी नव्या उमेदवाराला संधी देण्यात आली आहे.
भाजपने सलग तीन वेळा निवडून आलेल्या आमदाराचं तिकीट कापलं, ढसाढसा रडले; मतदारसंघात नवा शिलेदार कोण?
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात लखन मलिक यांनी कमळ फुलवलेलं
वाशिम विधानसभा मतदारसंघ हा १९९० पूर्वी काँग्रेसचा गड मानला जायचा. मात्र १९९० च्या विधानसभा निवडणुकीत लखन मलिक यांनी काँग्रेसच्या गडाला खिंडार पाडून इथे भाजपचं कमळ फुलवलं होतं. तेव्हापासून २००४ चा एक अपवाद वगळता इथे सातत्याने भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. १९९५ नंतर भाजपने सातत्याने इथे नवीन चेहऱ्याला संधी दिली. १९९९ च्या निवडणुकीत लखन मलिक यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली, मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. तेव्हा ते पक्षासोबत राहिले आणि भाजपचा विजय खेचून आणला.
पहिल्या यादीत नाव नसलं तरी दुसऱ्या यादीत नाव असेल, सलग ३ टर्म आमदार राहिलेल्या भाजप नेत्याला विश्वास
भाजपकडून उमेदवारी नसल्याने अपक्ष लढलेले लखन मलिक
२००४ मध्ये त्यांनी पुन्हा पक्षाला उमेदवारी मागितली परंतु पक्षाने त्यांचा विचार केला नाही आणि मोतीराम तुपसांडे यांना उमेदवारी दिली. मात्र यावेळी त्यांनी पक्षाशी बंडखोरी करत पतंग चिन्हावर अपक्ष निवडणूक लढली होती. आ. लखन मलिक यांच्या मेहतर समाज आणि त्यांच्या समर्थकांच्या भरोशावर त्यांनी २३६४१ मतं मिळवली, ते भाजपच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी कारणीभूत ठरले होते. त्यावेळी काँग्रेसचे सुरेश इंगळे हे विजयी झाले होते.
२००९ ते २०१९ सलग तीन वेळा लखन मलिक आमदार
लखन मलिक हे मेहतर समाजाचे नेते असून समाजातील पाहिले आमदार आहेत. मेहतर समाज राज्यातील प्रत्येक मतदार संघात विखुरलेला आहे. भाजप त्यांना उमेदवारी देत नसल्याने राज्यातील मेहतर समाज भाजपवर नाराज होत गेला. भाजपला त्याचा फटका बसू लागला. त्यामुळे मेहतर समाजाचे मतदार भाजपकडे वळवण्यासाठी भाजपने पुन्हा २००९ मध्ये लखन मलिक यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी विजय खेचून आणला. या मतदार संघात मेहतर समाजाचा उमेदवार निवडून येतो हे लक्षात आल्यावर भाजपने २००९ पासून २०१९ पर्यंत त्यांना उमेदवारी दिली आणि ते सलग तीन वेळा निवडून आले.
भाजपने लखन मलिकांचं तिकीट का कापलं?
मनमिळावू स्वभावाचे आमदार म्हणून त्यांची मतदारसंघात ओळख निर्माण झाली आहे. मात्र मतदार संघातील समस्या विधानसभेत पाहिजे त्याप्रमाणात न मांडणे तसंच भाजपच्या अनेक सर्वेत मलिक पिछाडीवर होते, असं सांगितलं जातं. त्यामुळे त्यांची उमेदवारी कापून त्यांच्या जागेवर उमेदवार बदलण्याचा निर्णय भाजपने घेतला असल्याचं बोललं जात आहे.
वाशिम मतदारसंघात भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी दिग्गज इच्छुक उमेदवार रांगेत उभे होते. मात्र यामध्ये मेहतर समाजातील श्याम खोडे हे एकमेव असल्याने भाजपने त्यांना उमेदवारी दिली असल्याचं राजकीय जाणकार सांगतात. भाजपने मेहतर समाजातीलच श्याम खोडे यांना उमेदवारी देऊन भाकरी जरी फिरवली असली, तरी ही भाकर करपणार नाही यासाठी भाजप कार्यकर्त्यांना प्रचंड मेहनत करावी लागणार आहे.
कोण आहेत श्याम खोडे?
श्याम खोडे हे मतदार संघातील मंगरुळपिर शहरातील रहिवाशी असून भाजपचे शहराध्यक्ष होते. आता भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव आणि बाबा बागेश्वरधाम भक्त परिवाराचे वाशिम जिल्हा संयोजक आहेत. त्यांचे वडील मंगरुळपिर नगर परिषदेचे अध्यक्ष होते.