Sharad Pawar NCP Solapur Mohol Candidate Siddhi Kadam : शरद पवारांनी माजी आमदार रमेश कदम यांच्या २६ वर्षीय कन्या सिद्धी कदम यांना मोहोळ विधानसभेची उमेदवारी जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला आहे. इच्छुकांना डावलल्याने बंडखोरीची शक्यता निर्माण झाली आहे.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात रमेश कदम हे सध्या जामिनावर बाहेर आले आहेत. २६ वर्षीय सिद्धी कदम या टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्सच्या विद्यार्थीनी आहेत. एका सामाजिक संस्थेक कार्यरत आहेत. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत रमेश कदम हे तुरुंगात होते, त्यावेळी सिद्धी कदम यांनी वडिलांचा जोमाने प्रचार केला होता. रमेश कदम तुरुंगात असताना २५ हजार मत मिळवण्यात सिद्धी कदम यांचा प्रमुख वाटा होता. मोहोळ मतदारसंघातून तुतारी हातात घेण्यासाठी अनेक नेते इच्छुक असताना सिद्धी कदम यांच्या हातात तुतारी दिली. त्यामुळे मोहोळ मतदारसंघात राष्ट्रवादी तुतारी पक्षात बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सिद्धी कदम मोहोळ विधानसभा मतदारसंघात सर्वात तरुण उमेदवार
सिद्धी कदम या माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या आहेत. सिद्धी कदम यांचे शिक्षण टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्समधून झालं आहे. त्या एका NGO मध्ये देखील काम करत होत्या. २०१९ च्या निवडणुकीत वडील तुरुंगात असताना त्यांनीच प्रचार यंत्रणा सांभाळली होती. २६ वर्षीय सिद्धी कदम या सोलापूर जिल्ह्यातील सर्व मतदार संघातील सर्वात तरुण उमेदवार आहेत.
सिद्धी कदम यांचे वडील रमेश कदम २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोहोळ विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. एक दबंग आणि थेट बोलणारा अधिकाऱ्यांशी भिडणारा आमदार म्हणून रमेश कदम यांची ओळख होती. मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ता ही योजना राबवून रमेश कदम राज्यात प्रसिद्ध झाले होते.
Solapur News : रमेश कदमांच्या २६ वर्षीय लेकीला शरद पवारांकडून तिकीट, इच्छुकांना डावलल्याने बंडखोरीची शक्यता
मोहोळ विधानसभा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे यशवंत माने हे विधानसभा निवडणूक लढवत आहेत. माजी आमदार राजन पाटील यांचा यशवंत माने यांना पाठिंबा आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघामधून शरद पवार गटाकडून अनेकजण इच्छुक होते. त्यामध्ये प्रामुख्याने संजय क्षीरसागर, राजू खरे यांची नावे आघाडीवर होती. तसेच लक्ष्मण ढोबळे यांच्यासह त्यांचे पुत्र अभिजीत ढोबळे, त्यांच्या कन्या कोमल ढोबळे या देखील इच्छुक होत्या. मात्र, अशात सिद्धी यांचे नाव अचानक जाहीर केल्याने मोहोळमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.