विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या पक्षाची आज तिसरी यादी जाहीर झाली. त्यात ९ जणांच्या नावांचा समावेश आहे. परळीतून पवारांनी राजेसाहेब देशमुख यांनी तिकीट दिलं आहे.
राजेभाऊ फड परळीतून लढण्यास इच्छुक होते. पण शरद पवारांनी त्यांच्याऐवजी राजेसाहेब देशमुख यांना तिकीट दिलं. त्यामुळे फड यांचे कार्यकर्ते भडकले. त्यांनी फड यांच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेले शरद पवारांचे आणि पक्षाचे बॅनर फाडले. यामुळे परळी विधानसभा मतदारसंघात अंतर्गत वाद उफाळून आला आहे. आता फड काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलं आहे.
राजेभाऊ फड परळीतून शरद पवारांचे संभाव्य उमेदवार समजले जात होते. त्यांनी निवडणूक लढण्याची तयारी केली होती. गेल्या १५ दिवसांत त्यांनी अनेकदा शरद पवारांच्या भेटी घेतल्या. पण शरद पवारांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात राजेसाहेब देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली. बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंविरोधात पवारांनी मराठा कार्ड वापरलं होतं. तोच पॅटर्न पवारांनी देशमुख यांची उमेदवारी देत रिपीट केला.
फड यांना तिकीट न मिळाल्यानं आक्रमक झालेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर असलेली पोस्टर फाडले. त्यावर शरदचंद्र पवारांच्या पक्षाचा उल्लेख होता. शरद पवार यांचा फोटोदेखील होता. फड यांचा एक कार्यकर्ता पोस्टरवरील फोटोला शाई फासण्यास गेला. पण त्याला शाई मिळालीच नाही. त्यामुळे त्यानं खिशात असलेल्या पेनमधील शाई काढली आणि ती पोस्टरला फासली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
नेत्याला तिकीट नाही, समर्थक भडकला; पवारांच्या फोटोस शाई फासायला गेला, पण शाईच मिळेना, मग…
राजेसाहेब देशमुख नेमके कोण?
राजेसाहेब देशमुख काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. पण पवारांनी काँग्रेसला भगदाड पाडत त्यांचा पक्षप्रवेश करुन घेतला. आता त्यांना धनंजय मुंडेंविरोधात उमेदवारी देण्यात आलेली आहे. देशमुख दिवंगत नेत्या विमल मुंदडा यांचे समर्थक मानले जातात. त्यांनी जिल्हा परिषदेत शिक्षण सभापतीपद भूषवलं आहे.