Ashok Chavan Criticised Congress : अशोक चव्हाण भोकरमध्ये मुलगी श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारार्थ बोलत असताना त्यांनी काँग्रेसवर टीका करत मोठा गौप्यस्फोट केला. काँग्रेसच्या जाचामुळेच पक्ष सोडल्याचं त्यांनी सांगितलं.
अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, शंकरराव चव्हाण यांची पुण्याई राज्याला, देशाला, नांदेड, मराठवाड्यासाठी एक वरदान आहे. ही इमारत बांधण्याचं काम शंकरराव चव्हाण यांनी केलं आहे. मात्र राजकारणात त्यांनाही त्रास झाला, पण त्यांनी बोलून दाखवलं नाही. एकेकाळी शंकरराव चव्हाण यांना सुद्धा समाजवादी पक्ष वेगळा काढावा लागला होता, असं चव्हाण म्हणाले.
भाजपने श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी दिली. मी त्यांचे आभार मानतो. श्रीजयाचे सर्व भाषेवर प्रभुत्व आहे. विधानसभा सभागृह काय मजाक आहे का? प्रतिनिधी हा बोलणारा आणि विकासाची जाण असणारा पाहिजे. ही निवडणूक गांभीर्याने घ्या. कुणाच्या लॉटरीसाठी चुकीचे बटन दाबू नका. लुंग्या-सुंग्या आला, तर मला नंतर दोष देऊ नका, असं देखील चव्हाण म्हणाले.
या मतदारसंघात खेळखंडोबा करण्याचं काम सुरू आहे. समाजात नरेटिव्ह सेट करण्यात येत आहेत. विविध उमेदवार देऊन मतं फोडली जात आहेत. हे समजून घ्या. उमेदवार जिंकण्यासाठी नाही, तर भाजपची एकगठ्ठा मतं फोडली जात आहेत. सगळ चांगलं चाललं असतानाही यांच्या पोटात गोळा उठत आहे. फक्त अशोक चव्हाण यांच्यावर टीका करणं हा एकच उद्योग आहे. नांदेडमध्ये माझं नाव न घेता मतं मागा, मी राजकीय दृष्ट्या जिवंत आहे म्हणून तुम्ही जिवंत राहाल, अशी टीकाही अशोक चव्हाण यांनी केली.
Ashok Chavan : भाजपच्या त्रासामुळे नाही, तर काँग्रेसच्या जाचामुळेच मी पक्ष बदलला! अशोक चव्हाण यांचा जाहीर सभेत गोप्यस्फोट
नांदेडला टार्गेट करण्यासाठी दिल्लीहून फर्मान
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात काँग्रेस नेत्यांवर टिका केली. नांदेडला टार्गेट केलं जात आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री येणार आहेत. दिल्लीहून फर्मान निघालं आहे. मी थांबणार नाही. माझं उर्वरीत आयुष्य भोकरसाठी समर्पित केलं आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.