Chandrapur Vidhan Sabha: मुनगंटीवार यांचा विरोध असतानाही आमदार किशोर जोरगेवार यांना भाजपात आयात केले गेले आहे. दुसरीकडे राजुरा विधानसभा मतदारसंघात भाजपने दिलेला उमेदवार कार्यकर्त्यांना रुचलेला नाही. राजुरा विधानसभेत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बाहेरचा उमेदवार दिला असल्याचे सांगत कार्यकर्ते नाराज आहेत. त्यात चंद्रपुरातील निष्ठावंताचेही सध्या दुखणे वाढले आहे.
राजुरा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार ऍड. संजय धोटे यांना डच्चू देण्यात आला आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांच्या जवळचे असलेले देवराव भोंगळे यांना तिकीट देण्यात आले. ही उमेदवारी राजुरा विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांना रूचलेली नाही. देवराव भोंगळे यांच्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध सुरु झाला आहे. माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी मनातील खदखद बाहेर काढली आहे.
पत्रकार परिषदेदरम्यान भोंगळे यांचा कुरापतीचा पाढा वाचण्यात आला आहे. कोणताही उमेदवार द्या मात्र तो स्थानिक असावा, बाहेरचं पार्सल नको, अशी भूमिका मांडत पक्षश्रेष्ठीपर्यंत कार्यकर्त्यांची भावना पोहचविणार असल्याचे धोटे, निमकर म्हणाले आहेत.
पाझारे अपक्ष?
भाजपचे कार्यकर्ते ब्रिजभूषण पाझारे यांना तिकीट मिळावे यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी ताकद लावली. जोरगेवार भाजपात नको म्हणणाऱ्या मुनगंटीवार यांना शह देत आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजपत पक्षप्रवेश केला. चंद्रपूर विधानसभेतून जोरगेवारांची उमेदवारी निश्चित झाली आहे. पक्षाने घेतलेल्या या निर्णयामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. पाझारे यांचे समर्थक हम लढेंगे असा नारा देत सुटले आहेत. काहींनी पाझारे उद्या नामांकन अर्ज दाखल करणार अशा पोस्ट वायरल केल्या आहेत. पाझारे यांनी नामांकन अर्ज दाखल केल्यास जोरगेवार यांना मोठा फटका बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पाझारे समर्थकांची नाराजी मुनगंटीवार कशी दूर करतात यावर बरेच गणित अवलंबून आहेत.