महायुतीनं मुंबईतील अंधेरी पूर्वच्या जागेसाठी उमेदवार निश्चित केलेला आहे. भाजपचे मुरजी पटेल ही जागा लढवणार आहेत. पण त्यासाठी ते शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत.
मुरजी पटेल मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत. ते भाजपचे मुंबई उपाध्यक्ष आहेत. अंधेरी पूर्व मतदारसंघातून ठाकरेसेनेनं विद्यमान आमदार ऋतुजा लटके यांना तिकीट दिलं आहे. त्यांचं नाव पहिल्याच यादीतून जाहीर करण्यात आलं. ऋतुजा लटके यांचं पती रमेश लटके यांचं निधन झाल्यानंतर ठाकरेसेनेनं पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटकेंना तिकीट दिलं. मशाल चिन्हावर विजयी झालेल्या त्या ठाकरेसेनेच्या पहिल्या उमेदवार आहेत.
मुरजी पटेल अंधेरी पूर्व परिसरात काका नावानं परिचित आहेत. २०२२ मध्ये अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक लागली. तेव्हा त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. ते निवडणूक लढवण्यासाठी इरेला पेटले होते. एखाद्या लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर त्याच्या घरातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात असल्यास, ती निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि मनसे प्रमुख राज ठाकरेंनी केलं. त्यामुळे भाजप-शिवसेना महायुतीनं निवडणुकीतून माघार घेतली. मुरजी पटेल यांनी अर्ज मागे घेतला.
मुरजी पटेल यांनी २०२२ मध्ये पोटनिवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी केली होती. ठाकरे गट पहिल्यांदाच मशाल चिन्हावर लढत असताना, ऋतुजा लटके यांच्याबद्दल सहानुभूती असतानाही पटेल निवडणूक लढण्यास इच्छुक होते. पण पक्षाचा आदेश आल्यानं त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. आता त्यांच्याकडे पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढवायची संधी आली आहे. पण अंधेरी पूर्वची जागा शिंदेसेनेला सुटल्यानं पटेल यांची गोची झाली. पण ते शिंदेसेनेत जातील आणि निवडणूक लढतील, असा निर्णय झाला. काही वेळातच त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.