Satish Shinde : अजित पवार यांनी धडाडीच्या कार्यशैलीवर विश्वास ठेऊन अजितदादा गटात जाणाऱ्या जिल्ह्यातील पहिल्या काही लोकांपैकी एक सतीश शिंदे होते. मात्र, त्यांनी रविवारी राष्ट्रवादी (शप) पक्षात प्रवेश करीत असल्याचे जाहीर केले आहे.
अजित पवार यांनी धडाडीच्या कार्यशैलीवर विश्वास ठेऊन अजितदादा गटात जाणाऱ्या जिल्ह्यातील पहिल्या काही लोकांपैकी एक सतीश शिंदे होते. मात्र, त्यांनी रविवारी राष्ट्रवादी (शप) पक्षात प्रवेश करीत असल्याचे जाहीर केले आहे. काटोल विधानसभा क्षेत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्याबद्दल त्यांची नाराजी होती. त्यामुळे त्यांनी अजितदादांची कास धरली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी शिंदे यांना शरद पवारांकडून बोलावणे आले. त्यांनी मुंबई गाठली. देशमुख व शिंदे यांना समोरासमोर बसवून त्यांच्यातील मतभेद दूर खुद्द पवारांनीच दूर केल्याचे कळते. यावर शिंदेंनी शरद पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. रविवारी त्याची घोषणा करण्यात आली. आपण आपल्याला पदाचा राजीनामा अजितदादा पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना पाठविला आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
काटोलमध्ये सुबोध मोहिते?
माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते हे काटोल मतदारसंघासाठी प्रयत्नरत असल्याचे कळते. वरुड मतदारसंघावरून अजितदादा व भाजप यांच्यातील वाटाघाटी फसल्याचे कळते. त्यामुळे अजितदादा यांनी आता काटोलवर दावा ठोकला आहे. मोहिते महायुतीचे उमेदवार व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वेळप्रसंगी मोहिते राष्ट्रवादीकडूनही (अप) अर्ज दाखल करू शकतात, अशी माहिती आहे.
हिंगण्यात काँग्रेसची बंडखोरी?
हिंगणा मतदारसंघात शरद पवारांनी त्यांचे जुने निष्ठावंत रमेश बंग यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे समजते. शिवसेना व राष्ट्रवादीने (शप) विदर्भात अनेक ठिकाणी परस्पर उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे आता रामटेकनंतर हिंगणामध्ये एका महिला उमेदवाराला व काटोल येथेही एका तरुण उमेदवाराला काँग्रेस समर्थन किंवा थेट ‘बी’ फॉर्मच देण्याची शक्यता वाढली आहे.