Maharashtra Election : महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागांवरून बऱ्यापैकी एकमत झाले, तरी शिवसेना (उबाठा) पक्षाने मात्र आक्रमक भूमिका घेतल्याने शेवटच्या क्षणापर्यंत जागावाटपाचा तिढा कायम आहे
महायुतीच्या जागांचे सूत्र दिल्लीवरूनच ठरले आहे. त्यानुसार भाजप १५३, शिवसेना ८०, तर राष्ट्रवादी काँग्रेस ५५ जागा लढविणार आहे. महाविकास आघाडीमध्ये मात्र जागावाटपाचा तिढा कायम आहे. यामुळे समसमान सूत्र काहीसे बाजूला सारून काँग्रेस १०२ किंवा १०३, शिवसेना (उबाठा) ९५, राष्ट्रवादी काँग्रेस-शप ८४ आणि इतर मित्रपक्ष ६ ते ७ असे सूत्र ठरेल, असे खात्रीलायकरित्या समजते.
ठाकरे गटामुळे तिढा कायम
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागांवरून बऱ्यापैकी एकमत झाले असले, तरी शिवसेना (उबाठा) पक्षाने मात्र काँग्रेससोबत आक्रमक भूमिका घेतल्याने शेवटच्या क्षणापर्यंत जागावाटपाचा तिढा कायम असल्याचे समजते. शिवसेना (उबाठा) पक्षाने आतापर्यंत ९५ जागा जाहीर केल्या. बोरिवली; तसेच खेड आळंदीवरून अजून वाद सुरू आहेत. मात्र, सोमवारी यावर पडदा पडेल आणि काँग्रेस १०२ किंवा १०३, शिवसेना (उबाठा) पक्ष ९५, राष्ट्रवादी काँग्रेस-शप ८४ आणि इतर मित्रपक्ष ६ ते ७ जागा असे सूत्र निश्चित होईल, असे समजते.
महायुतीचा वाद दिल्ली दरबारी
महायुतीचा जागावाटपावरून सुरू असलेला गोंधळ गेल्या आठवड्यात दिल्ली दरबारी पोहोचला. भाजपने सुरुवातीला १६० जागांसाठी आग्रह धरला होता, मात्र ते १५३च्या आसपास येऊन थांबणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या शिवसेनेसाठी ८५ जागांचा आग्रह धरला होता, मात्र त्यांना ८० जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचे समजते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही ६० जागांची मागणी केली होती. त्यांना ५३ जागा मिळाल्या. त्यांच्या वाट्याच्या आणखी दोन जागा वाढवण्यात आल्याचे समजते. मुंबईतील दादर माहीम, दिंडोशी, तसेच अंधेरी पूर्व अशा काही जागांवरून शिवसेनेच्या उमेदवारांची शेवटच्या क्षणी अदलाबदल होण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्यांच्या जागांच्या कोट्यामध्ये एक-दोन जागांचा फरक पडेल, असेही समजते. रिपाइं आठवले गटाला मुंबईतील एक जागा सोडण्याचा विचारही सुरू आहे.
MVA Seat Sharing : महाविकास आघाडी ‘समान सूत्र’ गुंडाळण्याचे संकेत, काँग्रेस मोठा भाऊ, शंभरहून अधिक जागा; ठाकरे-पवारांना किती?
अमित ठाकरे यांना पाठिंबा मिळणार की नाही?
दादर-माहीम मतदारसंघात शिवसेनेच्या सदा सरवणकर यांची उमेदवारी मागे घेऊन मनसेच्या अमित ठाकरे यांना पाठिंबा जाहीर करावा, यासाठी रविवारी उशिरापर्यंत खलबते सुरू होती. सदा सरवणकर यांनी माघार घेतल्यास त्याचा फायदा अमित ठाकरे यांच्याऐवजी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उमेदवारालाच अधिक होईल, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. महायुतीने अमित ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केल्यास या मतदारसंघात अमित ठाकरे यांचा एकहाती विजय होईल, असे मनसेचे म्हणणे असल्याचे समजते.