Lord Kuber info in Marathi: देवांचा सावकार किंवा खजिनदार, उत्तर दिशेचा स्वामी आणि यक्ष किन्नरांचा अधिपती म्हणजे कुबेर ! धन आणि विलासाची देवता म्हणजे कुबेर ! प्राचीन ग्रंथात कुबेराचा उल्लेख निधीपती, वैश्रवण या नावानेही येतो. लक्ष्मी मातेसोबत कुबेराची पूजा केली जाते. या लेखात अधिक जाणून घेवूया कुबेराबद्दल.
देवांचा सावकार किंवा खजिनदार
देवांचा सावकार किंवा खजिनदार, उत्तर दिशेचा स्वामी आणि यक्ष किन्नरांचा अधिपती म्हणजे कुबेर ! धन आणि विलासाची देवता म्हणजे कुबेर ! कुबेराने अलकापुरीची स्थापना का केली? या अलकापुरीबदद्ल आख्यायिका सांगितली जाते. कुबेराने ब्रह्मदेवाची वर्षानुवर्षे उपासना केल्याने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने त्याला अमरत्व, लंकेचे राज्य आणि पुष्पक विमान बहाल केले. पुढे रावणाने त्याच्यावर स्वारी केली आणि लंका तसेच पुष्पक विमान यावर कब्जा केला. तेव्हा कुबेराने पळून जाऊन अलकापुरी येथे आपले नवे राज्य प्रस्थापित केले.
भगवान कुबेराचे भाऊबंधू
कुबेराचा चैत्राथ उपवन असा राजवाडाच होता, असं भागवत पुराणात सांगितलं आहे. कैलास पर्वतावर विश्वकर्माने बांधलेल्या राजवाड्यात कुबेर राहतो, असंही म्हणतात. कुबेराच्या पित्याचे नाव ‘विश्रवस्’ असल्याने कुबेर वैश्रवण या पैतृक नावाने आणि मातेचे नाव इडविडा असल्याने कुबेर ऐडविड या मातृक नावाने देखील ओळखला जातो. ‘विश्रवस्’ ऋषी यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव कैकसी होते. तसंच, त्यांच्या पुत्रांची नावे, रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण अशी होती तर शुर्पणखा नावाची एक कन्या होती. त्यामुळे रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण हे भगवान कुबेर यांचे सावत्र बंधू होते.
यक्षांचा अधिपती कुबेर
हिंदू पुराणांनुसार कुबेर हा यक्षांचा अधिपती समजला जातो. धनत्रयोदशी दिवशी कुबेराची पूजा केली तर धनसंपत्ती प्राप्त होते असे म्हणतात. लक्ष्मी- कुूबेर पूजन करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. माता लक्ष्मी संपत्तीची प्रमुख देवता असून कुबेर हा देवतांच्या संपत्तीचा रक्षक मानला जातो. लक्ष्मी माता संपत्तीची देवी आहे पण संपत्तीचा हिशेब कुबेर ठेवतो.माता लक्ष्मीप्रमाणे कुबेराचे महत्त्व आहे. भगवान कुबेर यांच्याबद्दल असे सांगण्यात येते की, तिरुपती बालाजींनी विवाहासाठी त्याच्याकडूनच कर्ज घेतल्याची आख्यायिका आहे. आता तिरुपती म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार, याची परतफेड म्हणून तिरुपती बालाजीला सोने, चांदी, हिरे, मोती, आदी संपत्ती दान केले जातात. काही ठिकाणी असे म्हटले आहे की महालक्ष्मी मातेला कुबेर महाराजांकडून कर्ज घ्यावं लागलं होतं.
कुठे आहे कुबेराचे मंदिर?
कुबेराचे स्वतंत्र मंदिर पाहण्यासाठी उत्तराखंड, मध्यप्रदेश, बडोदा येथे आपल्याला जायला हवे, महाराष्ट्रात औरंगाबाद आणि नाशिक या ठिकाणी कुबेराचे मंदिर आहे. कुबेराची मूर्ती किंवा फोटो पाहिला तर तुम्हाला दिसेल. गोरा रंग, किरीट मुकुट धारण केलेला, विशाल उदर, पिवळी वस्त्रे आणि दागदागिने यांनी सजलेली अशी ही मूर्ती असते. सोने हे सर्वश्रेष्ठ धन मानले गेल्याने कुबेराचे वस्त्र पिवळे आहे. त्याच्या हातात रत्न पात्र आणि मुंगुसाच्या आकाराची थैली तिला नकुली असे म्हणतात.
पार्वती मातेने दिला शाप
कुबेर मुळात सुंदर होता. पण एकदा त्याने पार्वतीकडे सभिलाष दृष्टीने पाहिल्यामुळे तिने त्याला ‘तू कुरूप होशील’ असा शाप दिला आणि तेव्हापासून तो कुरूप झाला अशी आख्यायिका आहे.
कुबेराला वाहत नाही पैसे
कुबेराबद्दल असे सांगितले जाते की त्याला पैसे, धनसंपत्ती असे काही वाहत नाहीत. कारण तोच भक्तांना धन देतो अशी लोकांची भावना आहे. मात्र मंदिरात फुलं वाहतात. कुबेराची दिशा ही उत्तर असून धनत्रयोदशीला त्याची पूजा केली जाते. पितळेच्या भांड्यांची खरेदी करतात. कौबेरी ही त्याची भार्या, मणिग्रीव किंवा वर्णकवी आणि नलकुबर किंवा मुयरज हे त्याचे पुत्र आणि मीनाक्षी ही त्याची कन्या होती.
जैन आणि बौद्ध धर्म कुबेराबद्दल काय सांगतात?
जैन आणि बौद्ध धर्मात कुबेराबद्दल विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. जैन धर्मात एकूण २४ तीर्थंकर आहेत. त्यापैकी एकोणिसावे तीर्थंकर म्हणजे श्रीमल्लिनाथ भगवान असून या श्री मल्लिनाथ भगवानांचे देव म्हणजेच श्री कुबेर आहेत. असे जैन धार्मिक ग्रंथामध्ये लिहिले आहे. काही ग्रंथामध्ये कुबेर हा श्री नेमिनाथ भगवान या तीर्थंकरांचा यक्ष मानला आहे. त्यांच्या मते कुबेराला चार मस्तकं आणि आठ हात असतात. तर बौद्धांच्या मते, कुबेर हा धर्मपाल, पीतवर्ण आणि त्रिशूलधारी आहे. पुष्पक, हत्ती किंवा सिंह हे त्याचं वाहन, वसुंधरा ही शक्ती आणि मुंगुस हे त्याचं अभिज्ञानचिन्ह आहे. त्याने नागांवर विजय मिळवल्याने त्याचे एक प्रतिक म्हणा तो मुंगुस धारण करतो, असे लामा समाजाचे मत आहे. प्राचीनकाळी महाकोशकात कुबेरपूजा प्रचलित होती. कुबेराची तीन वाहने सांगितली जातात. कुबेराला जमिनीवरच्या धनाची माहिती मुंगूस देतो, पाण्यातल्या धनाची माहिती मासा, तर आकाशातल्या धनाची माहिती पांढरा अश्व देतो.
चांगल्या मार्गाने धन कमावले तरच टिकते
कुबेराची मूर्ती किंवा कुबेर यंत्राची स्थापना उत्तर दिशेला करतात. जो शुद्ध आणि संयमित राहतो त्याला धनपती कुबेर प्रसन्न होऊन धनासह सर्व गोष्टी प्रदान करतो असे मानले जाते. कुबेराची मूर्ती म्हणजे मांगल्य, भरभराट, ऐश्वर्य यांचं प्रतिक आहे. याच प्रतिकांमधून आपणास हाच बोध घ्यायचा आहे की, कोणतंही काम आपण श्रद्धेने, निष्ठेने, प्रामाणिकपणे करायचं आहे. तुम्ही चांगल्या मार्गाने धन कमावले तर ते तुमच्याकडे टिकून राहते आणि त्याची भरभराट होते.