Aaditya Thackeray vs Milind Deora: वरळीत शिंदेसेनेनं आदित्य ठाकरेंच्या विरोधात मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी, रणनीती आखण्यासाठी शिंदेंनी खास एक्का उतरवला आहे.
वरळीत मनसेनं गेल्या निवडणुकीत आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिला नव्हता. मात्र आता मनसेकडून संदीप देशपांडे रिंगणात आहेत. तर शिंदेंनी थेट देवरा यांनाच तिकीट दिलं आहे. त्यामुळे वरळीत तिरंगी लढत होणार आहे. देवरा यांना उमेदवारी देताना शिंदेंनी त्यांच्या प्रचाराची जबाबदारी श्रीकांत शिंदेंवर सोपवली आहे. त्यांना देवरांच्या प्रचारासाठी सर्व संसाधनं देण्यात आली आहेत.
वरळीतील विविध जातीधर्माचे मतदार आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी श्रीकांत शिंदेंनी रणनीती आखली आहे. कोळीवाड्यापासून गगनचुंबी इमारतीमधील मतदारांपर्यंत पोहोचण्याचं आव्हान उमेदवारांसमोर आहे. वरळीतील ६० टक्के मतदार मराठी आहेत. देवरा मारवाडी आहेत. त्यामुळे गुजराती आणि मारवाडी मतं खेचणं त्यांना तुलनेनं सोपं जाणार आहे.
शिंदेसेनेकडून रविवारी मतदारसंघात दोन सभा घेण्यात आल्या. पहिल्या बैठकीत शिंदेंनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत रणनीतीबद्दल चर्चा केली. दुसऱ्या बैठकीला स्थानिक नेते उपस्थित होते. त्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षांच्या नेत्यांचादेखील समावेश आहे. यावेळी श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. ‘आमचा लढा अदृश्य आमदाराविरुद्ध आहे, तो आमदार लोकांसाठी कधीच उपलब्ध नसतो. मतदारांना त्या आमदाराला पराभूत करायचं आहे. मिलिंद देवरा खासदार आहे. त्यांना वरळीची जाण आहे. त्यांचे वडिलदेखील खासदार होते,’ असं शिंदे म्हणाले.
Aaditya Thackeray vs Milind Deora: देवरांचा चेहरा, मागे बडा मोहरा; आदित्य ठाकरेंना पाडण्यासाठी शिंदेंचा एक्का; वरळीत फिल्डींग
शिंदेसेनेतील दोन स्थानिक नेत्यांनी वरळीतून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण पक्षाला इथून तुल्यबळ लढत देऊ शकेल असा उमेदवार हवा होता. आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार न देता आम्हाला पाठिंबा द्या, असा प्रस्ताव मनसेनं शिंदेसेनेला दिला होता. पण पक्षानं तो प्रस्ताव न स्वीकारता इथून देवरा यांना संधी दिली, असं पक्षातील एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं. वरळीतील लढत शिंदेंनी प्रतिष्ठेची केली आहे. आदित्य ठाकरेंना त्यांच्याच मतदारसंघात अधिकाधिक वेळ अडकवून ठेवण्याची खेळी शिंदेंकडून केली जात आहे.