Kalyan Vidhan Sabha Politics: भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते कल्याणमधील नाराजांची समजूत काढण्यास अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील इच्छुकांनी बंडाचा झेंडा हाती घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
सोमवारचा मुहुर्त साधत कल्याण पश्चिमेतून भाजपचे नरेंद्र पवार यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर मंगळवारी नरेंद्र पवार शक्तिप्रदर्शन करत आपल्या कार्यकर्त्यांसह दुसरा देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नरेंद्र पवारांनी बंडाची भूमिका घेतल्यानेम महायुतीतील तिढा वाढणार असल्याचे चित्र आहे.
तर दुसरीकडे कल्याण पूर्व मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये देखील बिघाडी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. काँग्रेसने कल्याण पूर्व मतदारसंघावर दावा केला होता. मात्र महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या वाट्याला ही जागा गेल्याने काँग्रेस पदाधिकारी नाराज होते, यामुळे मंगळवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी बंड पुकारत कल्याण पूर्व मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बोलताना सचिन पोटे यांनी मी अनेक महिन्यांपासून कल्याण पूर्व मतदारसंघ हा काँग्रेसला सोडावा, अशी मागणी महाविकास आघाडीकडे करत होतो. मात्र ही जागा अखेर ठाकरे गटाला देण्यात आली आहे. काँग्रेसची कल्याण पूर्व मतदारसंघात ताकद आहे. प्रत्यक्षात ही जागा भाजपची होती, भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्यासमोर शिवसेनेचे उमेदवार तीन वेळा पराभूत झाले होते. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे न झाल्याने आज अपक्ष अर्ज दाखल केला आहे. मी काँग्रेसला नव्हे तर काँग्रेसने मला वाऱ्यावर सोडले असल्याची खंत सचिन पोटे यांनी व्यक्त केली आहे.
कल्याण पूर्वेतून शिवसेना शिंदे गटामधील बंडखोर महेश गायकवाड यांनी देखील अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले की हा जनसामान्यांनी दिलेला आदेश आहे, कल्याण पूर्वेत कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही, शहराला भकास करून टाकले आहे. एका भ्रष्ट आणि नाकर्ता उमेदवार दिला आहे. त्यांच्या कुटुंबीयातील लोकांना सोडून कोणालाही उमेदवारी द्या, आम्ही महायुतीचा धर्म पाळू, काम करू. पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करणाऱ्याला एका पक्षाने उमेदवारी दिली, याचा लोकांमध्ये आक्रोश आहे. शिवसेनेचे नगरसेवक तर मला मदत करतील भाजपचे काही कार्यकर्ते देखील मला मदत करणार, असा दावा कल्याण पूर्व मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर महेश गायकवाड यांनी केला आहे.
महेश गायकवाड यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मिरवणुकीत शिवसेनेच्या कोणीही कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांनी सामील होऊ नये. महायुतीचा धर्म सर्वांनी पाळायचा आहे. जे या मिरवणुकीत सहभागी झाल्याचे दिसतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. गोपाळ लांडगे- जिल्हाप्रमुख, शिंदे शिवसेना.