Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून राजेश लाटकर यांना उमेदवारी दिल्यानंतर संतापाची लाट पसरली आहे. यामुळे आता या मतदारसंघातून उमेदवार बदलण्याची मागणी होत आहे. अशात मधुरिमाराजे छत्रपती यांचे नाव आघाडीवर आहे.
मधुरिमा राजे छत्रपती यांच नाव समोर
कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या रिंगणात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवार कोण असणार याचा प्रश्न निवडून जाहीर झाल्यापासून होता. रविवारी 27 (ऑक्टो) ला शिवसेना शिंदे गटाने माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना मैदानात उतरवल. तर दुसरीकडे काँग्रेसने राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र या उमेदवारीवरुन काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि नगरसेवकांनी उगड-उघड नाराजी व्यक्त केली. काँग्रेस जिल्हा कार्यालयावर दगडफेक झाली तर 26 नगरसेवकांनी सतेज पाटील यांना पत्र लिहीत हा लादलेला उमेदवार असल्याचा आरोप करत उमेदवार बदलण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर पक्षाचे सदस्य नसतानाही त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि निष्ठावंतांना डावलण्यात आले असा आरोप केला होता.
दरम्यान, आता आज सकाळपासून उमेदवार बदलाच्या घडामोडींना वेग आला असून बैठकांचा सत्र सुरू आहे. यामध्ये दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या आणि खासदार शाहू महाराज छत्रपती यांची सून असलेले मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून आली आहे. हा निर्णय अंतिम झाला असून औपचारिकरित्या नाव घोषित करणे अद्याप बाकी आहे.
नवीन राजवाड्यात मोठ्या घडामोडी
विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मधून मधुरिमा राजे छत्रपती यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावे असे काँग्रेस मधून अनेक नगरसेवकांची इच्छा होती. मात्र आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे म्हणत नकार दिला तर मालोजीराजे छत्रपती यांनी देखील निवडणूक लढण्यास नकार दिल्याने येथून उमेदवार कोण असणार याच्या चर्चा सुरू होत्या. राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नगरसेवकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यामुळे मधुरिमाराजे छत्रपती यांना निवडणूक लढण्यास तयार करण्यात आले असून काही वेळातच पत्रकार परिषद घेत अधिकृतरित्या उमेदवार बदलाची घोषणा होणार आहे. दरम्यान सोशल मीडियावर देखील मधुरीमाराजे छत्रपती यांचे पोस्टर जोरदारपणे व्हायरल होत असून नवीन राजवाडा येथे बैठकांचे सत्र सुरू आहे.