विधानसभा निवडणुकीसाठी शिंदेसेनेनं काल उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. शिंदेंनी पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापून राजेंद्र गावित यांना संधी दिली आहे.
श्रीनिवास वनगा पालघरचे आमदार आहेत. दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड केलं. त्या बंडात वनगा यांनी शिंदेंना साथ दिली. मात्र आता शिंदेंनी निवडणुकीचं तिकीट कापल्यानं वनगा यांना धक्का बसला आहे. शिंदे यांनी घात केल्याचा आरोप वनगा यांनी केला आहे. शिंदेंना साथ देऊन आपण चूक केली, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
‘माझ्यासोबत येणाऱ्या कोणत्याही आमदाराचं तिकीट कापणार नाही, असा शब्द शिंदे साहेबांनी दिला होता. सगळ्यांना उमेदवारी देणार आणि त्यांना निवडून आणणार, ती जबाबदारी माझी, असं आश्वासन शिंदेंनी दिलं होतं. इतक्या नेत्यांना शब्द देताना त्यांनी विचार करायला हवा होता ना? माझ्या प्रामाणिकपणाचं हे फळ आहे का?’, असे सवाल वनगा यांनी विचारले.
श्रीनिवास वनगा यांचे वडील चिंतामण वनगा पालघरमधील भाजपचे मोठे नेते होते. ते २०१४ मध्ये खासदार झाले. त्यांच्या निधनामुळे २०१८ मध्ये पालघर लोकसभेची पोटनिवडणूक झाली. त्यावेळी भाजपनं आपल्याला डावललं होतं, असा आरोप वनगा यांनी केला आहे. त्यावेळी भाजपनं काँग्रेसमधून आलेल्या राजेंद्र गावित यांनी तिकीट दिलं आणि त्यांना निवडून दिलं.
वडिलांची आठवण काढत श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले. ‘आज मला माझ्या वडिलांची आठवण येते. वडिलांनी प्रामाणिकपणे, निष्ठेने लोकांची कामं केली. मीदेखील प्रामाणिकपणे काम करायला गेलो आणि माझ्यासोबत असं घडलं. सगळ्या गोष्टी नियोजनबद्ध रितीनं करण्यात आलेल्या आहेत. त्यांना प्रामाणिक माणसं नकोत. चोरी लबाडी करणारी माणसं आज हवीहवीशी झाली आहेत,’ असा शब्दांत वनगा यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
शिंदेंकडून घात, देवमाणूस म्हणत ठाकरेंची माफी; आमदार ढसाढसा रडला, आयुष्य संपवण्याच्या विचारात
तुमचं तिकीट कापण्यात आल्यानंतर विरोधी पक्षातील कोणी तुमच्याशी संपर्क साधला का, उद्धव ठाकरेंशी काही बोलणं झालं का, अशी विचारणा केली असता वनगा यांना गहिवरुन आलं. ‘त्या देवाकडे मला फक्त माफी मागायची आहे. मी चुकलो साहेब, मला माफ करा,’ अशा शब्दांत वनगा यांनी ठाकरेंची माफी मागितली.