विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या मुस्लिम नेत्यानं समुदायातील संघटनांची बैठक बोलावली. ठाकरेसेनेच्या उमेदवारांवर बहिष्कार टाकण्याचा प्रस्ताव बैठकीत ठेवण्यात आला.
लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समुदायानं महाविकास आघाडीला भरभरुन मतदान केलं. काही मतदारसंघांमध्ये तर ठाकरेंचे उमेदवार मुस्लिम मतांमुळे जिंकले, असा दावा युसूफ अब्राहनी यांनी केला. यासाठी त्यांनी भायखळ्याचं उदाहरण दिलं. भायखळ्यात मुस्लिम मतदारांचं प्रमाण ४१ टक्के आहे. दक्षिण मुंबईतून लोकसभा लढलेल्या ठाकरेसेनेच्या अरविंद सावंत यांना भायखळा विधानसभा मतदारसंघातून ८६ हजार ८८३ मतं मिळाली. तर त्यांच्या विरोधी उमेदवार असलेल्या शिंदेसेनेच्या यामिनी जाधव यांना केवळ ४० हजार ८१७ मतं पडली, अशी आकडेवारी युसूफ अब्राहनी यांनी मांडली. विशेष म्हणजे जाधव या भायखळ्याच्या विद्यमान आमदार आहेत.
जाधव आता शिंदेसेनेकडून विधानसभा निवडणूक लढणार आहेत. ठाकरेंनी इथून मनोज जामसुतकर यांना तिकीट दिलं आहे. भायखळ्याच्या जागेवरुन काँग्रेस आणि ठाकरेसेनेत बरीच रस्सीखेच झाली. काँग्रेसला ही जागा सुटली असती, तर तिथून युसूफ अब्राहनी यांचं तिकीट जवळपास निश्चित मानलं जात होतं. ते सहज निवडूनही आले असते, असं त्यांच्या समुदायाच्या लोकांना आणि नेत्यांना वाटतं.
भायखळ्याची जागा अब्राहनी यांच्या पक्षानंच शिवसेनेसाठी सोडली. मग आता अब्राहनी ठाकरेंच्या उमेदवारांवर बहिष्कार घालण्याची मागणी का करत आहेत, असा सवाल ठाकरेंचे नेते सुभाष देसाईंनी विचारला. आम्ही वर्सोवा मतदारसंघातून हारुन खान यांना उमेदवारी दिली आहे. अब्राहनी यांना बहुधा त्याची कल्पना नसावी, असा टोला देसाईंनी लगावला. अब्राहनी यांना समुदायाशी काहीही देणंघेणं नाही. त्यांना तिकीट मिळालं नसल्यानं ते बहिष्काराची भाषा करत आहेत, असं देसाई म्हणाले. अब्राहनी यांनी त्यांच्या पक्षाकडे अन्य एखाद्या मतदारसंघातून उमेदवारी का मागितली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.