Nawab Malik Candiature: निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी उद्याचा एक दिवस शिल्लक आहे. आज अनेक दिग्गजांसोबत अन्य उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र काही जागांवर अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत चुरस पाहायला मिळत आहे. अशीच एक जागा म्हणजे मानखुर्द-शिवाजीनगरची. येथून नवाब मलिक उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान अणुशक्तीनगर मधून नवाब मलिक यांची मुलगी सना मलिकला राष्ट्रवादी (अजित पवार) कडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीला मुंबईत चारपेक्षा अधिक जागा मिळणार नसल्याने मलिकांची कोंडी होण्याची शक्यता आहे. यातच मुलीसाठी आपला पारंपारिक मतदारसंघ सोडत, नवाब मलिक मानखुर्द-शिवाजीनगर मधून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आता मलिकांना अधिकृत उमेदवारी कधी मिळते याबाबत राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता वाढली आहे.
मलिक आज उमेदवारी अर्ज दाखल करणार ?
माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत मलिक म्हणाले की, ‘२९ तारखेला सर्व गोष्टी स्पष्ट होतील. मी निवडणूक लढवणार असून कोणाला काय करायचं आहे याच्याशी आम्हाला देणं-घेणं नाही. गुंडागर्दी आणि नशामुक्त शिवाजीनगर करणं हाच निवडणुकीचा अजेंडा असेल”, असे नवाब मलिक म्हणाले. आता भाजपची मनधरणी करण्यात अजित पवार यशस्वी झाले आहेत की मलिक अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.
नवाब मलिक अजुनही तिकीटाच्या प्रतीक्षेत; भाजपची मनधरणी करण्यात अजितदादा यशस्वी होणार?
असा आहे नवाब मलिकांचा राजकीय प्रवास
नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वात चर्चित प्रवक्ते असाही त्यांचा लौकिक होता. ही बाब खुद्द शरद पवारांनी एका पत्रकार परिषदेत सांगितली होती. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मात्र अजित पवार गटासोबत जाणं मलिकांनी पसंत केलं.
२००९ मध्ये नवाब मलिक अणुशक्तीनगरमधून विजयी झाले होते. २०१४ मध्ये शिवसेनेच्या तुकाराम कातेंनी त्यांचा पराभव केला होता. २०१९ मध्ये पुन्हा नवाब मलिकांनी अणुशक्तीनगर मतदारसंघ पु्न्हा ताब्यात घेतला. आता यावेळी हे दोन्ही नेते अणुशक्तीनगरमधून निवडणूक लढवत नसल्याने राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.