Nanded Lok sabha BJP Candidate: भाजपने अखेर नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले डॉ. संतुक हंबर्डे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संतुक हंबर्डे यांचे छोटे बंधू मोहन हंबर्डे हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. दोन्ही भाऊ रिंगणात असणार आहेत तरी आखाडा मात्र वेगळा असणार आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे वसंत चव्हाण यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाला होता. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपवासी झाल्यानंतर ही वसंत चव्हाण यांनी माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना ६० हजार मतं मिळवत पराभवाची धूळ चारली. दुर्देवाने वसंत चव्हाण यांचे निधन झाल्याने नांदेडची जागा रिक्त झाली होती. रिक्त झालेल्या नांदेडच्या जागेसाठी २० नोव्हेंबरला विधानसभेच्या मतदानासोबतत मतदान पार पडणार आहे.
निवडणूक जाहीर होताच दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे सुपुत्र रविंद्र चव्हाण यांच्या नावाची काँग्रेसकडून घोषणा करण्यात आली. काँग्रेसकडून एकमेव नाव असल्याने रविंद्र चव्हाण यांची उमेदवारी निश्चित होती. काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली असली तरी भाजपने मात्र उमेदवार जाहीर केला नव्हता. भाजपकडून लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सुरुवातीला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र दोघांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला, त्यामुळे संतुक हंबर्डे, मारोतराव कवळे, राम पाटील रातोळीकर आदींनी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली होती.
अखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवसपूर्वी भाजपने जिल्हाध्यक्ष संतुक हंबर्डे यांच्या नावाची घोषणा केली आहे. संतुक हंबर्डे हे काँग्रेसचे विद्यमान आमदार मोहन हंबर्डे यांचे मोठे बंधू आहेत. काँग्रेसने मोहन हंबर्डे यांना नांदेड दक्षिणमधून विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे, तेव्हा दोन्ही भाऊ विरोधात प्रचार करताना दिसणार आहेत.
चव्हाण आणि हंबर्डे आमने सामने
नांदेडमध्ये आता दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. दोन्ही उमेदवारांसाठी ही पहिली निवडणूक आहे. रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेसचा पून्हा विजय होणार का? सहानभूतीची लाट मोडीत काढण्यासाठी भाजपला कितपत यश मिळेल हे पाहावे लागणार आहे. दरम्यान भाजपने संतुक हंबर्डे यांना उमेदवारी दिल्याने ही निवडणुकीत रंगत येणार आहे.