Dahanu Vidhan Sabha Nivadnuk: डहाणू मतदारसंघातून विनोद निकोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आपण २०१९ साली सर्वात गरीब आमदार म्हणून निवडून आलो होतो आणि आता देखील गरीब आमदार म्हणून निवडून येऊ असे त्यांनी सांगितले.
डहाणू येथील सागरनाका ते डहाणू प्रांत कार्यालय अशी भव्य रॅली काढत यावेळी माकप व महाविकास आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. या रॅलीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, कष्टकरी संघटना महाविकास आघाडीतील घटक पक्ष व संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते, आदिवासी समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने रॅलीत सहभाग झाले.
राज्यातील आणि केंद्रातील सरकार हे हुकूमशाही पद्धतीने वागत आहे. जनतेला आता बदल हवा असून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल. डहाणू विधानसभा निवडणुकीत जनता पुन्हा एकदा माझ्या पाठीशी उभी राहील. २०१९ साली राज्यातील सर्वात गरीब आमदार म्हणून निवडून आलो होतो आणि यंदा देखील राज्यातील सर्वात गरीब आमदार म्हणूनच निवडून येईन, असा विश्वास देखील यावेळी निकोले यांनी व्यक्त केला आहे.
राज्यात गेल्या अडीच वर्षातील महायुती सरकारचा कार्यकाळ हा भ्रष्ट, अनैतिक, जनता विरोधी, धर्मांध पद्धतीने राहिलेला असून महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात आजवर कधीच झालेले नव्हते असा आरोप किसान सभेचे अध्यक्ष माकप नेते अशोक ढवळे यांनी केला आहे. दोन पक्ष फोडून ५० खोके आमदारांना देऊन सरकार स्थापन करण्यात आले.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचा पाप ज्यांनी केलं त्याला महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला नाकारून धोबीपछाड दिला आहे. राज्यात वाढते महिला अत्याचार, हुकूमशाही पद्धतीने लादले गेलेले प्रकल्प आणि वाढलेली महागाई, भ्रष्टाचार या सर्वांमुळे राज्यातील जनता त्रस्त असून या विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी राहील. राज्यात सर्वत्र महाविकास आघाडीला विजयी करण्यासाठी लाल बावटा पूर्णपणे प्रयत्न करणार असून महविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन होईल असा विश्वास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते, किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांनी व्यक्त केला आहे.