Maharashtra Asselmbly Election 2024: आघाड्यांमध्ये कापाकापी, नाराजी, हट्ट, जागावाटपांचा तिढा, कुरबुरी आणि कुरघोड्या असे चित्र दिसले. त्यामुळे आजच्या राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हायलाइट्स:
- दोन्ही आघाड्यांतील खलबते संपेना
- जागावाटप सूत्रही ठरेना
- उमेदवारी अर्जासाठी आज शेवटचा दिवस; चित्र स्पष्ट होणार
दुसरीकडे, महायुतीच्या जागावाटपात भाजपने बीड जिल्ह्यातील आष्टीची जागा आपल्याकडे घेत माजी आमदार सुरेश धस यांना उमेदवारी दिली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांचे उमेदवारीचे स्वप्न भंगले. महायुतीला पाठिंबा देण्याबाबत मनसेने भूमिका घेतली असली तरी प्रत्यक्षात त्याबाबत सोमवारपर्यंत काहीही निश्चित झाले नव्हते. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे दादर-माहिम मतदारसंघातून उभे असून, तिथे शिवसेनेचे सदा सरवणकर हे विद्यमान आमदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरवणकर यांची समजूत काढून त्यांची उमेदवारी मागे घ्यावी, अशी मनसेची अपेक्षा आहे. मात्र, माघार घेण्याऐवजी सरवणकर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा करून टाकली.
महाविकास आघाडीमध्येही गोंधळाची स्थिती आहे. महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू असलेल्या जागांवर शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस परस्पर उमेदवार जाहीर करीत असल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसने दिग्रस मतदारसंघांतून माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, या मतदारसंघातून आधीच ठाकरेंच्या पक्षाने पवन जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया दिली. ‘शिवसेनेने उमेदवार दिलेला असताना काँग्रेसच्या यादीत त्यांनी आपला उमेदवार जाहीर केला आहे. मी असे मानतो की, ही टायपिंग मिस्टेक आहे. मात्र, अशा मिस्टेक आमच्याकडूनही होऊ शकतात. दिग्रससंदर्भात आमची आणि काँग्रेसची चर्चा झालेली आहे.
दिग्रसमध्ये आमचा उमेदवार लढणार नाही. माणिकराव ठाकरेंसाठी ती जागा आम्ही सोडलेली आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. ठाकरे गटाने सांगोल्यामधून दिपक आबा साळुंखे यांची उमेदवारी जाहीर केली असून ही जागा शेकापला हवी आहे. त्यासाठी शरद पवार स्वत: प्रयत्न करत असल्याचे समजते. हे सर्व सुरू असताना शरद पवार हे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख तसेच तालुकाप्रमुख फोडून त्यांना उमेदवारी जाहीर करत असल्याबाबतही ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री शिंदेंचे शक्तिप्रदर्शन
मुंबई/ठाणे : कोपरी -पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आदी उपस्थित होते. शिंदे यांच्याविरोधात शिवसेनेने (उबाठा) दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना रिंगणात उतरवले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यासह अनेकांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.