Pune News: ‘आरटीई’अंतर्गत पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये खोट्या पत्त्यांच्या आधारे प्रवेश घेतल्याचे आढळून आले आहे. त्याबाबत काही पालकांनी शिक्षण आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या.
‘आरटीई’अंतर्गत पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये खोट्या पत्त्यांच्या आधारे प्रवेश घेतल्याचे आढळून आले आहे. त्याबाबत काही पालकांनी शिक्षण आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारीच्या आधारे शिक्षण विभागाने चौकशी करून त्याचा अहवाल देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहायक संचालक ज्योती परिहार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. त्यानुसार परिहार यांच्या समितीने शिक्षण संचालनालयांना चौकशीचा अहवाल सादर केला होता. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि बारामती तालुक्यातील सुमारे २० पालकांनी खोटे पत्ते देऊन त्या आधारे प्रवेश दिले होते.
‘आरटीई’च्या २५ टक्के प्रवेशांतर्गत निवासाचा पत्ता या आधारावर प्रवेश मिळविला आहे. परंतु, चौकशीत पालकांनी दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचे आढळून आले आहे. तसा अहवाल देण्यात आला आहे. मुळशी तालुक्यातील खोट्या भाडेकराराच्या आधारे प्रवेश घेतलेल्या तीन मुलांच्या पालकांचे भाडेकरार एकाच घरात असल्याचे आढळून आले आहे. एकाच घरात तीन भाडेकरार; तसेच पालकांचे राहणीमान पाहता भाडेकराराबाबत शंका वाटत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या बालकांचे प्रवेश रद्द करावेत, असेही स्पष्ट करण्यात आले.
मुळशीसह बारामती तालुक्यातील २० विद्यार्थ्यांचे प्रवेश तत्काळ रद्द करण्याच्या सूचना शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. संबंधित बालकाच्या पालकांनी सादर केलेले निवासाचे पुरावे अवैध असल्याने सरकारची फसवणूक करून आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेश घेतल्याची बाब बेकायदेशीर आहे. त्या प्रकरणी संबंधित बालकांच्या पालकावर गुन्हा दाखल करावा तसेच ज्या घरमालकांनी अवैध निवासाचा पत्ता देण्यास संमती दिली त्या घरमालकांना सहआरोपी करावे, अशा सूचनाही शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
‘ते’ बालक काळ्या यादीत?
बोगस पत्त्याच्या आधारे आरटीईच्या २५ टक्के अंतर्गत प्रवेश मिळविणाऱ्या पालकांची नावे शोधण्यात आली आहेत. त्या पालकांच्या बालकांचे प्रवेश रद्द करण्यात येणार आहेत. त्याशिवाय यापुढील शैक्षणिक वर्षांमध्ये त्या बालकांना ‘आरईटी’च्या प्रवेश प्रक्रियेत काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. त्यामुळे या पालकांना यापुढे ‘आरईटी’अंतर्गत प्रवेश मिळू शकणार नसल्याचे असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
आरईटीअंतर्गत २५ टक्के प्रवेशांतर्गत बोगस पत्त्याच्या आधारे पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि बारामती तालुक्यातील प्रवेशाबाबत तक्रारी होत्या. त्या तक्रारीच्या अहवालानुसार संबंधित बालकांचे प्रवेश रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहरात अद्याप याबाबत कोणतीही तक्रार आली नाही.-संजय नाईकडे, शिक्षणाधिकारी
उपनगरातही बोगस प्रवेश?
पुणे शहरासह उपनगरातील विविध भागांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यात आलेल्या बालकांच्या पालकांनी निवासाचे बोगस पत्ते दाखवून प्रवेश घेतल्याची शक्यता आहे. मात्र, त्याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अद्याप चौकशी केली नाही. त्या चौकशीतही अनेक बोगस पत्त्यांच्या आधारे प्रवेश घेतल्याचे आढळून येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.