Dhanteras 2024: धनत्रयोदशीला धातू व प्रामुख्याने सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. यामुळेच सोने बाजारात गर्दी असते. मुंबई ही सोने खरेदी-विक्रीची मुख्य बाजारपेठ असून सोने खरेदीचा हब आहे.
धनत्रयोदशीला धातू व प्रामुख्याने सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. यामुळेच सोने बाजारात गर्दी असते. मुंबई ही सोने खरेदी-विक्रीची मुख्य बाजारपेठ असून सोने खरेदीचा हब आहे. यामुळेच एरव्ही जवळपास १५० ते २०० किलो सोन्याची उलाढाल होत असताना उत्सवी काळात मुंबईतील झवेरी बाजारात सरासरी ७०० ते ९०० किलो सोन्याची खरेदी-विक्री होते. यंदा मात्र सोन्याची दरवाढ पाहता त्यात घट झाली आहे. तरीही एकूण उलाढाल चित्र वाढली आहे.
याबाबत झवेरी बाजार येथील मुंबई ज्वेलरी असोसिएशचे उपाध्यक्ष कुमारपाल जैन यांनी सांगितले की, ‘यंदा सोन्याचे दर उच्चांकी असल्याने वजनातील खरेदी अपेक्षेहून कमी आहे. मात्र मुहुर्त साधण्यासाठी लहान प्रमाणात का होईना सोने खरेदीकडेच ग्राहकांचा कल आहे. त्यामुळे प्रामुख्याने कच्चे सोने किंवा सोन्याचे नाणे खरेदी करण्याला प्राधान्य आहे. याखेरीज आगामी विवाह काळ बघता त्यानिमित्ताने कानातले डूल, बांगड्या, अंगठ्या अशा लहान दागिन्यांना मागणी अधिक आहे.
मागील वर्षी धनत्रयोदशीला मुंबईत ७५० किलो सोनेखरेदी झाली होती. त्यावेळी सोन्याचा दर ६१ हजार रुपये प्रति तोळे (१० ग्रॅम) होता. हा दर आता यंदा उच्चांकी ८२ हजार रुपयांवर आहे. त्यामुळे प्रत्यक्षात वजनातील खरेदी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र दर अधिक असल्याने एकूण उलाढाल मागील वर्षीपेक्षा ४० टक्क्यांहून अधिक राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.