Ajit Pawar: कथित सिंचन घोटाळ्यातील चौकशीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्यावर तासगावातील सभेत गंभीर आरोप केले आहेत.
२०१४ मध्ये आर. आर. पाटील यांनी माझ्या चौकशीच्या फाईलवर सही केली होती. त्यानंतर राज्यातलं आमचं सरकार गेलं. आम्ही सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे आघाडीचं सरकार कोसळलं. यानंतर राष्ट्रपती राजवट लागू झाली. ती फाईल राज्यपालांकडे गेली. त्यांनी त्या फाईलवर स्वाक्षरी केली नाही. नवीन मुख्यमंत्री यावर काय तो निर्णय घेतील, अशी भूमिका त्यांनी घेतली, असं अजित पवार तासवागातील सभेत म्हणाले.
२०१४ मध्ये राज्यात सत्तांतर झालं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. तेव्हा त्यांनी मला बंगल्यावर बोलावून आर. आर. पाटील यांनीच तुमची खुली चौकशी करावी असे आदेश दिल्याचं सांगितलं. त्यांनी स्वाक्षरी केलेली फाईलदेखील दाखवली. केसानं गळा कापण्याचे धंदे आहेत राव, असा गंभीर आरोप पवारांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तासगावचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
याच सभेत अजित पवारांनी शरद पवारांच्या भूमिकांवरही प्रकाश टाकला. त्यात नसलेलं सातत्य अधोरेखित केलं. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्याच संध्याकाळी साहेबांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा न मागता दिला. त्यावर विचारधारा सोडून कशी काय मदत केली, असा प्रश्न मी साहेबांना विचारला. त्यावर सरकार बदललं आहे. मदत केली पाहिजे, असं उत्तर साहेबांनी दिलं होतं, असा किस्सा अजित पवारांनी सांगितला.