Pathri Assembly Constituency: पाथरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या एबी फॉर्मवर बाबाजानी दुर्राणी यांनी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे ही जागा काँग्रेसला देण्यात आली असून विद्यमान आमदार सुरेश वरपूडकर यांनी एबी फॉर्म लावून अर्ज देखील भरला आहे.
पाथरी विधानसभा मतदार सघात 2019 मध्ये काँग्रेसचे सुरेश वरपूडकर विजयी झाले होते. महाविकास आघाडीमध्ये ही जागा 2024 ला देखील काँग्रेसलाच सुटली. आणि काँग्रेसकडून दुसऱ्यांदा सुरेश वरपूडकर यांच्या उमेदवारीची घोषणा झाली. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये पाथरी विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच आहे असे स्पष्ट झाले होते. आमदार सुरेश वरपुडकर यांनी निवडणुकीची तयारी देखील सुरू केली. मतदारसंघात दौरे वाढवले आपला उमेदवारी अर्ज देखील भरला.
पाथरी विधानसभेची जागा काँग्रेसला सुटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावी अशी मागणी लावून धरली. दुरानी यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मागणीचा जोर लावून धरला. पण जागा काँग्रेसकडे असल्याने आणि तेथून विद्यमान आमदार असल्याने त्यांचे तिकीट काटून दुर्राणी यांना उमेदवारी देता येत नसल्याचे संकेत पक्षाकडून मिळत होते. पण बाबाजानी दुर्राणी यांनी आपले प्रयत्न कमी पडू दिले नाहीत.
लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला भरभरून मतदान दिल्यामुळे महाविकास आघाडीच्या तब्बल 35 जागा राज्यात निवडून आल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाला न्याय द्यावा अशी मागणी बाबाजानी दुर्राणी यांच्यासह मुस्लिम समुदायातील धर्मगुरू आणि प्रमुख नेत्यांनी महाविकास आघाडीकडे लावून धरली. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापुढे पेज निर्माण झाला. मुस्लिम समाजाला विधानसभा निवडणुकीत अपेक्षित न्याय न दिल्यास तो मतदार नाराज होऊन महाविकास आघाडी पासून दूर जाईल यामुळे बाबाजानी दुर्राणी यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी बाबाजानी दुर्राणी यांना मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण त्यात सर्वांनाच अपयश आले.
आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्याच दिवशी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म देऊन उमेदवारी दाखल करण्याच्या सूचना केल्या. बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्या समर्थकांसह पाथरी येथे भव्य असे शक्ती प्रदर्शन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी दाखल केली. उमेदवारी दाखल करताना बाबाजानी दुर्राणी यांनी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मीच असल्याचे आपल्या भाषणात संबोधित केले. त्यामुळे आता पाथरी विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला की राष्ट्रवादी काँग्रेसला हा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होते की दोघांपैकी एकाला माघार घ्यावी लागते हे मात्र येणाऱ्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे. पण सध्या तरी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे.
शरद पवार यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला उमेदवारी दिली – बाबाजानी दुर्राणी
शरद पवार यांनी माझ्यावर विश्वास टाकून पाथरी विधानसभा मतदारसंघातून मला उमेदवारी दिली आहे. पात्री विधानसभा मतदारसंघातून मागील निवडणुकीत आम्ही सुरेश वरपूडकर यांना आमदार म्हणून निवडून आणले होते. आता या वेळेस आमच्या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल. आम्ही दोघे एकाच गाडीत बसून मतदारसंघात फिरू मतदार दोघांपैकी ज्याला मतदान करायचे त्याला करतील. अनेक मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती होत असतात. हा मतदारसंघ शरद पवार यांना मानणार असल्याने माझा विजय निश्चित असल्याचेही बाबाजान दुर्राणी म्हणाले.