Shivsena UBT in Ratnagiri Vidhan Sabha: रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उदय बने यांनी शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी विधानसभेचे भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना लागलीच उमेदवारी जाहीर केली. या मतदारसंघातून उदय बने हे प्रबळ दावेदार मानले जात होते. शिवसेना नेते माजी खासदार अनंत गीते यांनीही उदय बने यांच्या उमेदवारीचे सूतोवाच अनेकदा यापूर्वी केले होते. उदय बने हे जिल्ह्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. ही उमेदवारी देताना आम्हाला विश्वासात घ्यायला हवे होते मात्र आम्ही ठाकरेंचे निष्ठावान कार्यकर्ते होतो. मात्र त्याचं फळ आम्हाला असं मिळालं, अशा स्वरूपाची प्रतिक्रिया बने यांनी दिली आहे.
कोण आहेत उदय बने?
उदय बने हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदेमध्ये वेगवेगळ्या गटांमधून सलग पाच वेळा विजयी होण्याची मोठी किमया त्यांनी साधली आहे. ते आजवर रत्नागिरी जिल्हा परिषदेचे तब्बल तीन वेळा उपाध्यक्ष राहिले आहेत. इतकेच नाहीतर जिल्हा परिषदेमधील विविध विषय समित्यांचे सभापती पदही त्यांनी भूषवले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेमधील अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. जिल्हा परिषदेच्या कारकिर्दीत सलग पाचवेळा सदस्य म्हणून निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. तब्बल तीन वेळा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. विविध शैक्षणिक सामाजिक संस्थांवर ते कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर उदय बने यांच्या वाढदिवसाला शिवसेनेचे जेष्ठ नेते माजी खासदार अनंत गीते यांनी खास उपस्थिती लावली होती. त्याचवेळी अनंत गीते यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात पुढचा सामना हा उदय विरुद्ध उदय असा होईल आणि आपला उदय विजयी होईल असे जाहीरपणे सूतोवाच केले होते.
मात्र त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार बाळ माने यांनी थेट मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. इतकेच नाही तर त्यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारीही मिळवली. या सगळ्या घडामोडीवरून उदय बने नाराज झाले आहेत.