राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. ते यावेळी मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. तर त्यांची लेक अणुशक्तीनगरमधून लढत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसनं अणुशक्तीनगरमधून मलिक यांच्या कन्या सना यांना तिकीट दिलं. त्यानंतर आता नवाब मलिक यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. यानंतर आता भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची प्रतिक्रिया आलेली आहे. भाजप नवाब मलिक यांचा प्रचार करणार नसल्याचं शेलार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे.
‘महायुतीमध्ये असलेल्या सर्व पक्षांनी आपापले उमेदवार आपणच ठरवायचे आहेत. विषय केवळ नवाब मलिक यांच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून असलेल्या उमेदवारीबद्दल आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका याआधीही स्पष्ट केली आहे आणि मीही वारंवार मांडली आहे. आता पुन्हा एकदा सांगतो, नवाब मलिक यांच्या उमेदवारीबद्दल भाजपची भूमिका हीच आहे की भाजप नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही. दाऊद आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तीच्या प्रचाराची आमची भूमिका नाही,’ अशा शब्दांत शेलारांनी नवाब मलिकांच्या उमेदवारीवर भाष्य केलं.
सना मलिक यांच्या कन्या अणुशक्तीनगर मतदारसंघातून पहिल्यांदाच लढत आहेत. याआधी इथून नवाब मलिक विजयी झाले आहेत. पण यंदा नवाब मलिक यांनी हा मतदारसंघ लेकीसाठी सोडला आहे. सना मलिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याबद्दलही शेलारांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ‘सना मलिक यांच्या बाबतीत तशी (नवाब मलिक यांच्या संदर्भात आली तशी) कोणतीही माहिती किंवा पुरावा समोर येत नाही, तोपर्यंत महायुतीचा उमेदवार हाच भाजपचा उमेदवार आहे. याबद्दल अन्य प्रश्न उपस्थितच होत नाही,’ असं शेलार म्हणाले.