Nanded Cash Seized: निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना नांदेड पोलिसांच्या हाताला मोठे घबाड लागले आहे. चारचाकी वाहनातून १ कोटी ५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
नांदेडमध्ये विधानसभेसोबतच लोकसभेची पोटनिवडणूक पार पडत आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आणि पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहेत. यासाठी पोलीस दलाकडून शहरासह जिल्ह्यातील मुख्य मार्गांवर फिक्स पॉईंट लावण्यात आले आहेत. या फिक्स पॉईंटवर वाहनांची तपासणी केली जात आहे. नांदेड शहरातील भावसार चौक येथे भाग्यनगर पोलिसांनी तपासणी नाका लावला आहे. मंगळवारी सुरु असलेल्या तपासणीदरम्यान वाहन क्रमांक (एमएच १२ टीव्ही ४०१६) या चार चाकी वाहनावर पोलिसांना संशय आला. पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख आणि त्यांच्या टीमने वाहनांची तपासणी केली असता लोखंडी पेट्यांमध्ये एक कोटी पाच लाख रुपये आढळून आले. या रकमेबाबत वाहन चालकाकडे पोलिसांनी खुलासा मागितला, पण वाहनचालक योग्य खुलासा देवू शकला नाही, त्यामुळे पोलिसांनी ही रक्कम जप्त केली. निवडणूक विभागाला याबाबत माहिती देखील देण्यात आली. शहरात एक कोटी रुपयाची रक्कम आढळल्याने खळबळ उडाली होती.
रायगडातही कोट्यावधींची चांदी जप्त
अलीकडेच रायगडमधील खालापूर टोल नाक्यावर गस्तीदरम्यान पोलिसांना कोट्यावधींची चांदी सापडली होती. २६ ऑक्टोबरच्या सकाळी पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोमध्ये ही चांदी सापडली होती. तात्काळ दबा धरून बसलेल्या पोलिसांनी पिकअप ताब्यात घेत तपासणी केली असता त्यात कोट्यवधी रुपयांची चांदी असल्याचे उघडकीस आले. ताब्यात घेतलेले वाहन खालापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर पंचासमक्ष मालाची तपासणी करण्यात आली. जवळपास पाच ते सात कोटी रुपयांची चांदी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान अवैध वस्तूंचा आणि दारुगोळ्याच्या वाहतुकीला रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.