Solapur South Vidhan Sabha MVA Candidate: सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेत्याची मोठी फजिती झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या तिसऱ्या यादीत दिलीप मानेंचे नाव आले, कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मात्र उमेदवारी अर्ज भरताना एबी फॉर्मच काँग्रेस पक्षाने दिला नाही.
मध्यच्या उमेदवाराला रात्री एबी फॉर्म, दिलीप माने ऑन होल्ड?
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. सोमवारी रात्रीच चेतन नरोटे यांना एबी फॉर्म मिळाला होता. त्याच्या दोन दिवसांअगोदर काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत दिलीप मानेंचे नाव आले होते. २९ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. दिलीप मानेंनी एबी फॉर्मसाठी शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली. अखेर वेळ निघून जाईल या भीतीने कार्यकर्त्यांना सोबत घेत दिलीप मानेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. सोलापूरमध्ये दक्षिणच्या जागेवरून महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडतो की काय असे चित्र निर्माण झाले आहे.
महाविकास आघाडीतील उमेदवारांनी भरला अर्ज
महाविकास आघाडी मधील शिवसेना(उबाठा) उमेदवार अमर पाटील यांनी सोमवारी दुपारी उमेदवारी अर्ज भरला आहे. शिवसेनेकडून अमर पाटील यांना एबी फॉर्म मिळाला आहे. रविवारी रात्री काँग्रेसची तिसरी यादी जाहीर झाली त्यामध्ये दिलीप मानेंना उमेदवारी दिल्याची घोषणा झाली होती. काँग्रेस पक्षाकडून एबी फॉर्म येईल, अशी आशा बाळगत दिलीप माने यांनी मंगळवारी दुपारपर्यंत वाट पाहिली. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मात्र त्यांनी अपक्ष किंवा स्वतंत्र उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादीचे नेते धर्मराज काडादी यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्याकडे उमेदवारी मागितली होती. राष्ट्रवादीच्या यादीत काडादीचे नाव आले नाही. मंगळवारी 29 ऑक्टोबर रोजी दुपारी काडादी यांनीही दक्षिण तहसील कार्यालयात आले आणि उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे सोलापूर दक्षिण मतदारसंघात महाविकास आघाडीत गोंधळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे.