Ahilyanagar News : मटक्याचा धंदा करणाऱ्यांकडे पोलिसांनी लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सापळा रचून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
तो सापळा नसल्याने त्यावेळी आरोपींना पकडता आले नाही. त्यामुळे यासंबंधीची तांत्रिक पूर्तता करून आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता आरोपींविरूद्ध अटकेची कारवाई केली जाईल.
श्रीरामपूरमधील एका मटका धंदा चालवणाऱ्याने याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्याने म्हटले आहे की, हे तिन्ही पोलीस त्याच्याकडे आले. मटक्याचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी पाच हजार रुपये हप्ता आणि सुमारे अडीच हजार रुपये किमतीची ब्रँडेड दारूची बाटली मागितली. लाचलुचपत विभागाने केलेल्या पडताळणीत मागणी सिद्ध झाली. लाच घेण्यासाठी आलेल्या पोलिसांनी चार हजार रुपये घेतले. दारूची बाटली आणि उरलेले एक हजार रुपये नंतर आणून देण्यास सांगितले. त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणाऱ्या या व्यक्तीचा श्रीरामपूरमध्ये मटक्याचा अवैध व्यवसाय आहे. तो सुरू ठेवण्यासाठी या तीन पोलिसांनी त्याच्याकडे दरमहा सहा हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केली होती. तडजोडीअंती पाच हजार रुपयांचा हप्ता घेण्याचे कबूल केले. मटका चालवणाऱ्या यासंबंधी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली. पथकाने पडताळणीसाठी पंच पाठवले. लाच मागणी पडताळणी दरम्यान पोलीस नाईक रघुवीर ओंकार कारखिले यांनी तक्रारदाराकडे त्याच्या मटक्याच्या व्यवसायावर कारवाई न करता व्यवसाय चालू ठेवण्यासाठी लाचेची मागणी केली.
मटक्याचा धंदा चालवणाऱ्यांकडून पोलिसांनी लाच मागितली; दारुची बाटली, आणि…. तिघांविरोधात गुन्हा दाखल
विशेष म्हणजे तक्रारदार नको म्हणत असताना कारखिले त्याला मटक्याचा व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी घेऊन गेले. तेथे त्याच्याकडून चार हजार रुपये घेतले. उरलेले एक हजार रुपये व दारूच्या खंब्याची मागणी केली. यावेळी कारखिले यांचे दोन सहकारी पोलीस लाच मागण्यासाठी प्रोत्साहन देत ती स्वीकारण्याची तयारी दर्शवत होते. त्यामुळे या तिघांविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजू आल्हाट, पोलीस अंमलदार किशोर लाड, सचिन सुद्रुक, हारुण शेख व दशरथ लाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.