Sangamner Mahayuti Candidate: संगमनेर येथून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी जाहीर झाली. त्याविरोधात भाजपकडून डॉ. सुजय विखे यांना संधी देण्याचं जवळपास निश्चित झालं होतं. मात्र वेळेवर ही जागा शिंदे सेनेकडे गेली. आता यामागील कारण स्वत: सुजय विखे यांनी सांगितलं आहे.
याचे कारण आता स्वत: सुजय विखे यांनीच सांगितले आहे. ते म्हणाले, धांदरफळ येथे माझ्या सभेच्या व्यासपीठावरून जे वादग्रस्त वक्तव्य झाले, त्यामुळे ही जागा भाजपला न देता शिंदे गटाकडेच ठेवण्याचा निर्णय झाला. शिवाय मी भाजपचा माजी खासदार असल्याने उमेदवारीसाठी शिंदे गटात जाणे संयुक्तिक नव्हते. ते आम्ही टाळले आणि संधी हुकली.
शेवटपर्यंत निर्णय रखडलेल्या संगमनेरच्या जागेचा निर्णय झाला. त्यानंतर डॉ. सुजय विखे यांची संधी हुकल्याची चर्चा सुरू झाली. त्यावर बोलताना विखे यांनी ही कारण सांगितले आहे. पुढे ते म्हणाले, मात्र ही वेळ लोकशाही पद्धतीने नाही तर विरोधकांना दडपशाही पद्धतीने मिळाली आहे. माझ्या विरोधात त्या ठिकाणी नेरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आला. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून वरच्या पातळीवर निर्णय होऊन ती जागा शिवसेना शिंदे गटाला गेली असावी, असा माझा अंदाज असल्याचे सुजय विखे म्हणाले.
काही दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे डॉ. सुजय विखे यांच्या युवा संकल्प सभेत बोलताना भाजप ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत देशमुख यांनी थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर जाळपोळ, मोडतोड आणि नंतर आरोपप्रात्यारोप झाले होते. हीच घटना भोवल्याचे डॉ. विखे यांना आता वाटत आहे. यासंबंधी प्रसार माध्यमांशी बोलताना डॉ. विखे म्हणाले, संगमनेरची जागा भाजपला मिळावी यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला. त्यामुळे ही जागा अगदी शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात आली. उरलेल्या आठ-दहा जागांवर वरच्या स्तरावर वाटाघाटी झाल्या. त्यात संगमनेरचाही समावेश होता. ज्या पद्धतीचा वातावरण त्या ठिकाणी निर्माण झाले, ते दुर्दैव आहे. आमची सर्व बाजूंनी तयारी होती. सर्वेक्षणही झाले होते. मात्र, जागा शिंदे गटाकडे गेली. मी भाजपचा माजी खासदार असल्याने उमेदवारीसाठी शिंदे गटात जाणे योग्य नव्हते. त्यामुळे अमोल खताळ यांचे नाव सूचविले आणि त्यांना उमेदवारी जाहीर झाली. धांदरफळमध्ये आमच्यावर हल्ला करणाऱ्यांवर क़डक कारवाई झाली नाही, तर आम्ही संगमनेरमध्ये आंदोलन करू, असा इशाराही डॉ. विखे यांनी दिला.