Parag Shah Wealth: २०१९शी तुलना केली तर शहा यांच्या संपत्तीत दहापटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यावेळी शहा यांनी २३९ कोटी रुपयांची तर, पत्नीच्या नावावर १६० कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती.
२०१९शी तुलना केली तर शहा यांच्या संपत्तीत दहापटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यावेळी शहा यांनी २३९ कोटी रुपयांची तर, पत्नीच्या नावावर १६० कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. तर कौटुंबिक संपत्ती २३ कोटी रुपयांची होती. त्यांच्याकडे असलेल्या स्थावर मालमत्तेचे मूल्य ३० कोटी तर पत्नीच्या नावे मालमत्तेचे मूल्य ३६.६४ कोटी रुपये होते.
मिलिंद देवरा यांनी शिवसेनेकडून वरळी या मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रात स्वतःकडे १३१ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले आहे. यातील ७३ कोटी रुपयांची संपत्ती ही गुंतवणुकीच्या स्वरूपात आहे. तर पत्नीच्या नावावर २९.९५ कोटी रुपयांची संपत्ती असून त्यातील १७ कोटी रुपये गुंतवणुकीच्या स्वरूपात आहे. तर मिलिंद यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेचे मूल्य १५.४३ कोटी रुपये तर पत्नीच्या नावावर असलेल्या संपत्तीचे मूल्य ८.५६ कोटी रुपये आहे. देवरा यांच्यावर कुठलेही कर्ज नाही. परंतु, त्यांनी ५३ कोटी रुपयांचे कर्ज इतरांना दिले आहे. तर त्यांच्या पत्नीने ८.४२ कोटी रुपयांचे कर्ज इतरांना दिले आहे.
शिवसेनेकडून मुंबादेवी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शायना एनसी यांनी स्वतःकडे १७.४५ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. तर, पती मनीष मुनोत यांच्याकडे ३८.८९ कोटी रुपयांची, कौटुंबिक संपत्ती १८.३४ कोटी रुपयांची तर मुलगा अयानच्या नावावर १.३८ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. शायना यांच्या नावावर असलेल्या स्थावर मालमत्तेचे मूल्य २३.७१ कोटी रुपये तर, पतीच्या नावावर असलेल्या संपत्तीचे मूल्य ३९.९० कोटी रुपये आहे. तसेच मुलाच्या नावावर असलेल्या संपत्तीचे मूल्य ६.५७ कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहे. वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीचे मूल्य ३८ लाख रुपये असून पतीच्या नावावर असलेल्या संपत्तीचे मूल्य २५ लाख रुपये आहे. शायना यांच्यावर २.२७ कोटी रुपयांचे, पतीवर १६ कोटी रुपयांचे, कुटुंबावर ३.५३ कोटी रुपयांचे तर, मुलावर ३२ लाख रुपयांचे कर्ज आहे.
बोरिवली मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेल्या गोपाळ शेट्टी यांच्याकडे २.९६ कोटी रुपयांची तर, पत्नीकडे १२.१८ कोटी रुपयांची संपत्ती आहे. शेट्टी यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेचे मूल्य ८० लाख रुपये तर, पत्नीच्या नावावर असलेल्या संपत्तीचे मूल्य ९ कोटी रुपये आहे.
मलिक यांच्या संपत्तीत काहीशी वाढ
मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या नवाब मलिक यांच्या संपत्तीत काहीशी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. नवाब यांनी स्वतःकडे १.८५ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली असून पत्नी मेहजबीन यांच्या नावावर २.२९ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. त्यांच्या नावावर असलेल्या स्थावर मालमत्तेचे मूल्य ३.४१ कोटी रुपये तर, पत्नीच्या नावावर असलेल्या मालमत्तेचे मूल्य ५१.६२ कोटी रुपये आहे. नवाब यांच्यावर १.३७ कोटी रुपयांचे कर्ज असून त्यांच्या पत्नीच्या नावावर ११ लाखांचे कर्ज आहे. २०१९मध्ये मलिक यांनी आपली संपत्ती ३७ लाख तर, पत्नीच्या नावावर १.५३ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले होते.