यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे मैदानात उतरले आहेत. मात्र या जागेवर शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. युती धर्म पाळला जावा आणि या जागेवर शिंदेंनी आपला उमेदवार देऊ नये अशी भूमिका भाजपने घेतली होती. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
अमित ठाकरेंना मदत केली पाहिजे असं स्पष्ट मत भाजपचं होतं, कारण राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीला पाठिंबा दिला होता. एका जागेवर ते मदत मागत असतील तर दिली पाहिजे असं आमचं मत आहे आणि मुख्यमंत्र्यांचे मत यापेक्षा वेगळं असं नाही. यासंदर्भात मी स्वत: सीएम साहेबांकडे गेल होतो, मी त्यांना हे पण म्हटलं होतं की एखादी सीट एक्सचेंज करून घेऊ, आमची एखादी सीट घेऊन तुम्ही करू शकत असाल तर तसा त्यांनी प्रयत्नही केला. तिथले जे उमेदवार आहेत त्यांना बोलावून घेतलं, त्यांच्या पक्षातील नेत्यांचं असं मत होतं की, आमचा उमेदवार लढला नाही तर ती मते उबाठाकडे जातील, त्यातून दोघांचेही नुकसान होईल त्यामुळे ते काही तयार झाले नाहीत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
माझं अजुनही स्पष्ट मत आहे की, इतर जागांवर आमचे उमेदवार त्यांच्याविरूद्ध लढतील पण ठाकरेंनी मोदींना समर्थन देण्याची भूमिका घेतली आहे, त्यामुळे एका जागेवर त्यांना समर्थन दिलं पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले. त्यामुळे आता येत्या ४ ऑक्टोबरपर्यंत काही वेगळा निर्णय घेतला जातो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.