Devendra Fadnavis: पुढचा मुख्यमंत्री भाजपचा असेल आणि तो मनसेच्या साथीनं होईल असं भाकीत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी वर्तवलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक स्टोरी इन्स्टाला शेअर केली आहे.
राज्यात पुन्हा एकदा युतीची सत्ता येईल. भाजपचा मुख्यमंत्री होईल, असं मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर त्यांनी ५ सेकंदांचा पॉझ घेतला. मग त्यांनी मनसेच्या साथीनं, अशी पुस्ती जोडली. महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री मनसेच्या साथीनं होईल, असं राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या इन्स्टा स्टोरीला राज ठाकरेंसोबतचा फोटो ठेवला. या फोटोसोबत त्यांनी सरकार चित्रपटातील साम दाम दंड भेद गाणं वापरलं आहे. त्यामुळे फडणवीसांच्या स्टोरीची जोरदार चर्चा आहे.
एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीबद्दल सविस्तर भाष्य केलं. तीन महिन्यांपूर्वी राज्यातील परिस्थिती वेगळी वाटत होती. पण हरियाणाच्या निकालानंतर परिस्थिती बदलली आहे. पण तरीही युतीसाठी गोष्टी तितक्याही सोप्या नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले. मनसे पुढील सरकारमध्ये असेल. आमचे नेते सत्तेत असतील, याचा पुनरुच्चारदेखील राज यांनी केला.
Devendra Fadnavis: भाजपचा CM होईल! राज ठाकरेंची थिअरी अन् फडणवीसांनी लगेच टाकली इन्स्टा स्टोरी, गाणंही लक्षवेधी
निवडणूक निकालानंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास कोणासोबत जाणार, असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. त्यावर महाविकास आघाडी सोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, असं राज यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं. माझ्या आयुष्यात आलेला दुसरा पक्ष भाजपच असल्याचा उल्लेख करताना राज यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत असलेल्या जवळच्या संबंधांचा खास उल्लेख केला. माझ्या आयुष्यात आलेला दुसरा पक्ष भाजपच आहे. मग ते प्रमोद महाजन असोत वा गोपीनाथ मुंडे किंवा नितीन गडकरी. आमच्या घरी त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांची ये-जा असायची, अशा आठवणी राज यांनी जागवल्या.