Amit Shah and PM Modi Rally: भाजप बड्या नेत्यांकडून महाराष्ट्रात प्रचाराचा धुरळा उडवला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात सलग ८ दिवस मॅरेथॉन सभा होणारच आहेत. पण यासोबतच महायुतीच्या उमेदवारांसाठी केंद्रीय मंत्री अमित शहा देखील महाराष्ट्रात तंबू ठोकणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत यंदा महायुतीच्या यंदा महायुतीतील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबतच पक्षश्रेष्ठींचाही कस लागणार आहे. जास्तीत जास्त जागा खेचून आणण्यासाठी जोर लावावा लागणार आहे. त्यासाठीच महायुतीकडून नियोजन केले जात आहे. महाराष्ट्राची प्रचाराची धुरा भाजपच्या बड्या नेत्यांच्याच हाती असणार आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या आयोजित ८ सभांच्या दुप्पट सभा केंद्रीय मंत्री अमित शहा घेणार आहेत.
महाराष्ट्र विधानसभेचे रण यंदा प्रचारसभांनी गाजणार असल्याचे चित्र आहे. भाजपकडून १०० हून अधिक सभांचे नियोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात सलग ८ दिवस प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. तर अमित शहांच्या एकूण २० सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातील भाजपचे बडे नेतेही विधानसभेच्या प्रचारासाठी जोर लावणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील यांच्याकडेही प्रचारसभांची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. यासोबतच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. तर गोवा, मध्यप्रदेश, हरियाणातील मुख्यमंत्री देखील महाराष्ट्रातील महायुतीच्या उमेदवारांसाठी जोर लावणार आहेत.