Sada Sarvankar: दादर माहीम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सदा सरवणकर यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे पाठिंबा मागितला आहे. सरवणकर यांच्यापुढे निवडणुकीत राज यांचे पुत्र अमित यांचं आव्हान आहे.
सदा सरवणकर दादर माहीमचे २०१४ पासून आमदार आहेत. यंदाही ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मनसेकडून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे. राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभादेखील घेतल्या होत्या. राज ठाकरेंनी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून दादर माहीममध्ये महायुतीनं त्यांना पाठिंबा द्यावा, अशी भूमिका भाजपची आहे. पण आमदार सरवणकर मागे हटण्यास तयार नाहीत. आता त्यांनी थेट राज ठाकरेंना उद्देशून एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांना बाळासाहेबांचा खास उल्लेख केला आहे.
‘मी चाळीस वर्षापासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. आम्ही आमच्या कष्टाने आणि घामाने तीन वेळा माहिमचा आमदार झालो. बाळासाहेब असते तर त्यांनी मला आपल्या नातेवाईकांसाठी सीट सोडायला सांगितलं नसतं. त्यांचे पन्नास नातेवाईक दादर – माहिम मध्ये राहतात पण उमेदवारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली. ते कार्यकर्त्याची भावना जपणारे नेते होते,’ अशा शब्दांत सरवणकर यांनी राज यांना बाळासाहेबांच्या शिकवणीची आठवण करुन दिली आहे.
‘एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहा. त्यांचे सुपुत्र हे तीन वेळचे खासदार असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलाला केंद्रात मंत्री बनवले नाही, तर एका निष्ठावंत शिवसैनिकाला ती संधी दिली. राजसाहेबांना मी विनंती करतो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका. मला आपले समर्थन द्या,’ असं सरवणकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता दादर-माहीममध्ये काय घडणार याची उत्सुकता आहे. उमेदवार अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर आहे. त्यामुळे तोपर्यंत या मतदारसंघात नाट्यमय घडामोडी घडू शकतात.