Crores Of Rupees Seized At Palghar : पालघरमध्ये तपासणी नाक्यावर पोलिसांनी कोट्यवधींची रोख रक्कम जप्त केली आहे. पोलिसांनी नाकांबदी दरम्यान व्हॅन अडवून मोठी कारवाई केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूकीच्या काळात अवैध धंदे, अवैध मद्य वाहतूक आणि इतर गैरप्रकार रोखण्यासाठी पालघर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्याच्या सीमा भागात नाकाबंदी करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात गुजरात, दादरा- नगर- हवेली, दमण सीमा भाग आणि विविध ठिकाणी जिल्ह्यातील पोलीस दलामार्फत नाकाबंदी करण्यात आली असून २४ तास या ठिकाणी पोलिसांमार्फत वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
पोलिसांची मोठी कारवाई
पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील उधवा येथील तपासणी नाक्यावर पोलिसांना एका व्हॅनमधून रोख रकमेची वाहतूक होत असल्याचं तपासणी दरम्यान आढळून आलं आहे. व्हॅनमधून या रोख रकमेची वाहतूक महाराष्ट्र राज्यात करण्यात येत होती. तलासरी पोलिसांनी व्हॅनमधून वाहतूक होत असलेली ४ कोटी २५ लाखांची रोख रक्कम आणि व्हॅन जप्त केली आहे.
व्हॅनमधून वाहतूक होत असलेली ही ४ कोटी २५ लाखांची रोख रक्कम नेमकी आली कुठून? ती कुठे नेण्यात येत होती? या रोख रकमेचा नेमका स्त्रोत कोणता होता? त्याचप्रमाणे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या रोख रकमेचा काही संबंध आहे का? याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, चार दिवसांपूर्वी रायगडमध्ये खालापूर टोल नाक्यावर जवळपास ५ ते ७ कोटींची चांदी जप्त करण्यात आली होती. चांदीसोबत मिठाईचे खोके पोलिसांना आढळले होते. नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी ही कारवाई करत चांदीची वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेतला होता.