Raj Thackeray: सौदेबाजीतून घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील राजकारणाचा चिखळ झाला असा आरोप करत याला शरद पवार जबाबदार असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरील माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी अमित शहा, नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर टीका केली. मला नेहमी विचारले जाते तुम्ही भूमिका बदलल्या. पण हा प्रश्न पत्रकार इतर नेत्यांना विचारत नाहीत. मी कधीच भूमिका बदलल्या नाहीत. मी ज्या गोष्टी बोललो आहे, ज्या भूमिका मांडल्या आहेत त्या कोणत्याही पदासाठी मुख्यमंत्रीपदासाठी, आमदार निवडणून आणणाऱ्या राजकीय सौदेबाजीतून घेतल्या नाहीत. जे चांगले होते त्याला चांगले म्हटले आणि जे चूकीचे होत त्याला चूक म्हटले. मात्र गेल्या दोन अडीच वर्षात जे काही केले. त्यांना हा प्रश्न विचारणे गरजेचे आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाकीच्यांनी गेल्या दोन वर्षात घेतलेल्या भूमिका या सौदेबाजीतून घेतलेल्या भूमिका असल्याचा आरोप राज यांनी केला. या सर्व भूमिका या सत्तेतील पदासाठी घेतल्या होत्या आणि त्याला भूमिका बदलने म्हणतात.
मोदींवर टीका
यावेळी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा टीका केली. देशाचा पंतप्रधान म्हणून फक्त गुजरातचा फायदा होणार असेल तर मला ते आवडणार नाही. पंतप्रधानांसाठी प्रत्येक राज्य हे समान असेल पाहिजे. माझी ही भूमिका चुकीची होती का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मी २०१४ साली म्हणालो होतो की- मोदींनी पंतप्रधान झाल्यावर उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या तीन राज्यांकडे लक्ष द्यावे. जेणेकरून तिकडे उद्योग येतील, तेथील लोकांना रोजगार मिळेल आणि त्या राज्याचे ओझे महाराष्ट्रावर येणार नाही. मोदींकडून काही अपेक्षा ठेवल्या होत्या. पण ते पंतप्रधान झाल्यावर तसे काही झालेच नाही. काही वेगळ्याच गोष्टी होऊ लागल्या, असे राज ठाकरे म्हणाले. नोट बंदी ही फसलेली गोष्ट होती. हे सर्वांना माहिती आहे. पण त्यावर बोलायचे नाही? असे देखील राज म्हणाले.
उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारा
२०१९च्या निवडणुकीच्या आधी शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदाबाबत ठरले होते तर ते बाहेर येऊन का सांगितले नाही, असा सवाल राज यांनी विचारला. तुम्ही युतीत होता, मते मागितली, विजयी झाला, स्पष्ट बहुमत दिल्यानंतर तुम्ही म्हणता आता अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद द्यावे. यावर भाजपने असा कोणताही शब्द दिलाच नसल्याचे सांगितले. राज ठाकरे यांनी यावर भाष्य करत स्पष्ट केली की याबाबत मला ना उद्धव ठाकरेंवर विश्वास आहे ना अमित शहांवर.जेव्हा पंतप्रधान आणि गृहमंत्री येऊन सांगतात की मुख्यमंत्री कोण होणार तेव्हा तुम्ही (उद्धव ठाकरे) आक्षेप का घेतला नाही? असा प्रश्न राज यांनी विचारला.
गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचका झाला, घाण झाली याला सर्वात जास्त जबाबदार शरद पवार असल्याचे राज म्हणाले.