Indian Girl Dhairya Reached peak of Kilimanjaro: इच्छाशक्ती, जिद्द, धाडस, चिकाटी अन् धैर्य उराशी बाळगून अवघ्या १२ वर्षांच्या धैर्या कुलकर्णी हिने आफ्रिका खंडातील सर्वात उंच असलेले किलीमांजारो शिखर सर केले आहे.
आफ्रिका खंडातील दक्षिण आफ्रिका येथील किलीमांजारो हे शिखर गिर्यारोहकांसाठी एक आव्हानच आहे. ट्रेकिंग, गिर्यारोहण करणाऱ्यांना हे शिखर सर करण्याचे स्वप्न सतत खुनावत असते. तब्बल ५ हजार ८५० मीटर इतकी उंची असलेले शिखर अनेक आव्हानांवर मात करत सर करावे लागते. उणे ५ ते ६ अंश सेल्सिअस तापमान, बर्फ, थंडी, ऑक्सिजन कमी, रात्रीचा प्रवास अशा स्थितीत हे शिखर चढावे लागते. सहा वर्षांपासून ट्रेकिंगचा छंद लागलेल्या धैर्या हिला सुध्दा किली मंजारो शिखर सतत खुनावत होते. गत एप्रिलमध्ये तिने भारतातील सर्वात उंच असलेल्या एव्हरेस्ट शिखरचा बेस कॅम्प पूर्ण केला होता. तेव्हा तिला एव्हरेस्टवीर प्रियंका मोहिते, गगन हल्लुर यांची साथ, मार्गदर्शन मिळाले होते. त्यांच्या साथीने आज धैर्याने किलीमांजारो शिखर पार केले.
किलीमंजारो शिखर म्हणजे मृत ज्वालामुखीच. धैर्याने ५ हजार ६५० मीटर उंचीवर किलीमंजारो शिखर पार केले. २५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या सहा दिवसांत धैर्याने ही कामगिरी पार पाडली. यावेळी तिच्यासोबत प्रियंका मोहिते, गगन हल्लुर होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली धैर्याने अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत हे शिखर पार केले. तिला किलीमांजारो नॅशनल पार्कतर्फे प्रमाणपत्रही देण्यात आले.
असा केला प्रवास…
धैर्याने पहिल्या दिवशी २ हजार ७२० मीटर उंची गाठण्यासाठी ८ किलोमीटरचा प्रवास केला. दुसऱ्या दिवशी ३ हजार ७२० मीटर उंचीवर पोहोचत ११ किलोमीटर अंतर पार केले. तिसऱ्या दिवशी ४ हजार २०० मीटर उंची गाठली. चौथ्या दिवशी ९ किलोमीटरचा प्रवास केला. पाचव्या दिवशी पहाटे चारच्या सुमारास चालण्यास सुरुवात करत दुपारी १२.३० वाजता शिखर सर केले. सहाव्या दिवशी किलीमंजारो नॅशनल पार्ककडे परतली.
कैलास बागल यांचेही मार्गदर्शन
धैर्याने येथील गुरुकूल स्कूलमध्ये इयत्ता ७ वीमध्ये शिक्षण घेत आहेत. गिर्यारोहक कैलास बागल यांच्या मार्गदर्शनाखाली तिने सातत्याने सह्याद्री पर्वत रांगासह जिल्ह्यासह परिसरातील अनेक ठिकाणांनी ट्रेक पूर्ण केले आहेत. सातारा जनता सहकारी बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, शिक्षिका सौ. ज्योती कुलकर्णी यांची ती मुलगी असून, त्यांची प्रेरणा तिला बळ देत असते. तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
किलीमांजारो शिखर हे अतिशय आव्हानात्मक आहे. अत्यंत कमी वयात धैर्याने हे शिखर सर केले. तब्बल ७८ किलोमीटर चढ-उताराचा प्रवास करताना तिने कोठेच गिव्हअप केले नाही. धैर्यामधील साहस अतुलनीय आहे.
प्रियंका मोहिते, एव्हरेस्टवीर
धैर्याची ‘एव्हरेस्ट’ कामगिरी
गत एप्रिल महिन्यात धैर्याने एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिम पूर्ण केली होती. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी, तिही आई-वडिल, पालकांशिवाय बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या देशातील पहिली मुलगी ठरली होती. हा कॅम्प ५५४५ मीटर इतका उंचीचा आहे. धैर्याने दररोज १० ते १५ किलोमीटर असे चालत तब्बल १४ दिवसांमध्ये १३० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला होता. तोही मायनस १० डिग्री तापमानामध्ये. एव्हरेस्टवेळी वार्षिक परीक्षा असताना, तर आता सहामाही परीक्षा असतानाही तिने पहाटे चार वाजता तसेच संध्याकाळीही सराव केला आहे