Raj Thackeray News: गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवारांनी जे जातीपातीचे राजकारण केले. तसे राजकारण कधीच अजित पवारांनी केले नाही, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजितदादांचे कौतुक केले.
एका प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, मला अजित पवारांबद्दलची एकच गोष्ट आवडते. मला त्यांचे राजकारण आणि बाकीच्या गोष्टी आवडत नाहीत. पण त्यांची एक गोष्ट आवडते ती म्हणजे त्यांनी जातपात कधी मानली नाही. अजित पवार कधी जातीपातीच्या राजकारणात अडकले नाहीत. शरद पवार जे आजपर्यंत करत आले. त्यामध्ये इतक्या वर्षात तुम्हाला ती गोष्ट करताना अजित पवार कुठे दिसणार नाहीत. मला वाटते ही एक सकारात्मक गोष्ट आहे, असे राज ठाकरे म्हणाले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरील माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात बोलत होते.
कोणाचे सरकार येईल? कोण मुख्यमंत्री होईल?
आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात कोणाचे सरकार येईल या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार येईल.३ महिन्यांपूर्वी असे वाटत होते महाविकास आघाडीचे पारडे वर चालले आहे. पण हरियाणाच्या निवडणुका झाल्या त्यामुळे पुन्हा चित्र बदलेले दिसेल. अर्थात युतीसाठी हे इतके सोपे देखील नाही असे राज म्हणाले. राज्यात मुख्यमंत्री भाजपचा होईल असे देखील राज ठाकरे म्हणाले.
छगन भुजबळांनी आमचा पक्ष काढावा
काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ असे म्हणाले होते की, राज्यातील पुतणे सगळीकडे घोळ करतात. यावर राज म्हणाले, भुजबळांनी सर्व पुतण्यांचा मिळून पक्ष काढावा. फक्त पुतण्या नाही तर मुले देखील आहेतच ना. आणि ते स्वत: पुतण्यासोबत गेले. ते काकांसोबत थांबले नाही. किमान त्यांनी काकांची साथ सोडायला नको होती. मला भुजबळांबद्दल सहानभूती नाही असे देखील राज यांनी सांगितले.
या मुलाखतीत राज ठाकरे यांनी राज्यातील गेल्या ५ वर्षातील राजकारणाला शरद पवार जबाबदार असल्याचे म्हटले. त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाचा चिखल झाला, असे राज म्हणाले.