Nawab Malik: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरुन आता महायुतीत ठिणगी पडली आहे. आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे राष्ट्रवादीला सांगितलेली होती, असं फडणवीस म्हणाले आहेत.
नवाब मलिकांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी व्यवहार केल्याचे आरोप भाजपच्या नेत्यांनी केले होते. मलिक अनेक महिने तुरुंगातदेखील होते. त्यांच्या उमेदवारीला भाजपचा ठाम विरोध होता. पण भाजपचा दबाव झुगारुन देत राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना मानखुर्दमधून उमेदवारी दिली. त्याबद्दल भाजप नेत्यांनी जाहीर नाराजी बोलून दाखवली आहे.
‘आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांगितली होती. नवाब मलिकांना अधिकृत उमेदवारी देऊ नका. महायुतीत हे चांगल्या प्रकारे घेतलं जाणार नाही. तरीदेखील त्यांनी ती उमेदवारी दिली. त्यांच्यासमोर आम्ही शिवसेनेचा उमेदवार दिला. आम्ही तिथे शिवसेनेचं काम करु. भाजप कोणत्याही परिस्थितीत नवाब मलिकांचं काम करणार नाही,’ असं फडणवीस म्हणाले.
मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातून शिवसेनेनं सुरेश कृष्णराव पाटील यांना उमेदवारी दिली आहे. ते बुलेट पाटील नावानं परिसरात ओळखले जातात. त्यांनी काल भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांची भेट घेतली. त्यावेळी सोमय्या यांनी त्यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला. आपण पाटलांचा प्रचार करणार असल्याचं सोमय्यांनी ट्विटरवर म्हटलं. आता फडणवीस यांनीदेखील तशीच भूमिका घेतली आहे.
Nawab Malik: मलिकांना तिकीट, नाराज फडणवीसांचा ‘बुलेट पाटलां’ना सपोर्ट; अजितदादांची गुगली, सस्पेन्स वाढला
मलिक यांच्या उमेदवारीला भाजपचा असलेला विरोध पाहता अजित पवारांनी काहीसा सावध पवित्रा घेतला आहे. ‘अर्ज माघारी घेण्याचा दिवस ४ नोव्हेंबर आहे. त्या दिवशी दुपारी ३ वाजता चित्र स्पष्ट होईल,’ असं पवार म्हणाले. ‘मलिकांवर आरोप करण्यात आलेला आहे. त्या आरोपात तथ्य नाही असं आमचं म्हणणं आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर न्याय व्यवस्था निर्णय देईल. त्यावेळी आपल्याला वस्तुस्थिती कळेल,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली.