Raj Thackeray: विधानसभा निवडणुकीची लगबग राज्यात सुरु असताना मनसे प्रमुख राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत घडलेल्या घडामोडींचा उल्लेख एका कार्यक्रमात केला.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेनं मुंबईतील ३ जागा लढवल्या. पैकी एका जागेवर त्यांना निसटता विजय मिळाला. तर दोन जागांवर त्यांचे उमेदवार पराभूत झाले. या पराभवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हट्ट कारणीभूत ठरल्याचं मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. ‘दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबईत तुमच्या हाती काहीही लागणार नाही ही गोष्ट मी त्यांना सांगत होतो. त्या जागा लढवू नका, असं मी अनेकदा सांगितलं. पण त्या जागा हट्टापायी पदरात पाडून घ्यायच्याच असं ठरवलं असेल तर घ्या पदरात पाडून,’ असं राज ठाकरे म्हणाले. ते एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.
राज ठाकरेंच्या मनसेनं लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत राज यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभादेखील घेतल्या. महायुतीनं राज ठाकरेंना दोन जागा देऊ केल्या होत्या. त्यातील एक जागा दक्षिण मुंबईची होती. पण इथे राज यांच्या उमेदवारानं मनसेच्या चिन्हावर न लढता शिवसेनेच्या चिन्हावर लढावं, अशी अट शिंदेंनी घेतली. ती राज यांनी नाकारली होती. अखेर राज यांनी एकही जागा लढवली नाही.
Raj Thackeray: ‘त्या’ २ जागा शिंदेंच्या हट्टानं गेल्या, मी निशाणी ढापलेली नाही; राज ठाकरेंचा सणसणीत टोला
शिंदेंनी त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर आमच्या उमेदवारांना लढायला सांगितलं होतं, ही बाब राज यांनी सांगितली. त्यावेळी त्यांनी निवडणूक चिन्हावरुन शिंदेंना सणसणीत टोला लगावला. ‘तुम्ही मला सांगताय, आमच्या निशाणीवर निवडणूक लढवली पाहिजे. रेल्वे इंजिन ही मी कमावलेली निशाणी आहे, ढापलेली निशाणी नाहीए. इतक्या वर्षांच्या निवडणूक प्रवासानंतर ती निशाणी आम्हाला मिळाली आहे. लोकांच्या मतदानातून आम्हाला ती निशाणी मिळालेली आहे, ती कोर्टातून आलेली नाही,’ अशा शब्दांत राज यांनी शिंदेंना चिमटा काढला.