Raj Thackeray: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसे सत्तेत असेल, असा विश्वास राज ठाकरेंनी पुन्हा एकदा व्यक्त केलेला आहे. मनसेच्या साथीनं भाजपचा मुख्यमंत्री होईल, असं भाकत त्यांनी वर्तवलं.
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत कालच संपली. आता २० नोव्हेंबरला मतदान होईल. त्यानंतर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर करण्यात येईल. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पक्षाची पुढील भूमिका, वाटचाल स्पष्ट केली. निकालानंतर मनसे सत्तेत असेल. माझ्या सोबत असलेले नेते सत्तेत बसलेले दिसतील. रिमोट कंट्रोल माझ्याकडे असेल. त्या रिमोटसाठी मी नवीन सेलदेखील घेतले आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात युतीचंच सरकार येईल. तीन महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीचं पारडं जड वाटत होतं. पण हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पारडं फिरलं आहे. आता राज्यात पुन्हा युतीचं सरकार येईल. माझा ठोकताळा असा आहे की आम्ही सत्तेत बसू. मनसेच्या मदतीनं भाजपचा मुख्यमंत्री होईल, असं राज ठाकरेंनी सांगितलं. ते एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.
हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर कल काहीसा बदलला आहे. पण तरीही परिस्थिती महायुतीसाठी सोपी नाही, असं राज ठाकरे म्हणाले. निवडणूक निकालानंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास दोनपैकी कोणत्या आघाडीकडे जाणार, असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. त्यावर महाविकास आघाडी सोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, असं राज यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं.
भारतीय जनता पक्षासोबत, त्यांच्या नेत्यांसोबत असलेल्या ऋणानुबंधांचा राज यांनी विशेष उल्लेख केला. माझ्या आयुष्यात आलेला दुसरा पक्ष भाजपच आहे. मग ते प्रमोद महाजन असोत वा गोपीनाथ मुंडे किंवा नितीन गडकरी. आमच्या घरी त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांची ये-जा असायची. ही सगळी नेते मंडळी बाळासाहेबांना भेटायला यायची, अशा शब्दांत राज यांनी आठवणींना उजाळा दिला.