Devendra Fadnavis on Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षाचा कालावधी पूर्ण केलेले देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाविषयी महत्वाची टिप्पणी केली आहे. मला आता मुख्यमंत्रीपदाची लालसा उरलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, ‘मी पाच वर्षे राज्याचा मुख्यमंत्री होतो. आतापर्यंत महाराष्ट्रात फक्त दोन मुख्यमंत्र्यांनाच ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला आहे. त्यापैकी एक म्हणजे वसंतराव नाईक आणि दुसरा म्हणजे मी. त्यामुळे आता मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न किंवा लालसा माझ्या मनात उरलेली नाही.’
राज्यात महायुतीचे नवे राजकीय समीकरण बनण्याच्या वेळी ते मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार वरिष्ठांच्या आदेशामुळे फडणवीसांना मुख्यमंत्रीपदापासून दूर राहावे लागले होते. तर मध्यंतरी त्यांनी राज्यात आपल्याला मोठे पद भूषवण्याची इच्छा नसून संघटनात्मक काम करण्यासाठी तयार असल्याचेही पक्षश्रेष्ठींना सांगितले होते. मात्र दिल्लीश्वरांनी त्यांची ही मागणी देखील धुडकावून लावली होती. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना तोंड फुटले असताना मात्र महायुतीसोबतच मविआमधील प्रमुख नेत्यांनीही मात्र काहीही स्पष्ट केलेले नाही.
यानंतर आता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता मला जी जबाबदारी देण्यात येईल, ती स्वीकारुन मी काम करेन. महायुती ज्याला मुख्यमंत्री ठरवेल, त्याच्या पाठिशी मी ठामपणे उभा राहीन.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी बसण्याच्या प्रश्नावर मात्र उत्तर देण्याचे टाळले आहे. राजकारणात अशा चर्चा होत असतात, त्याची उत्तर द्यायची नसतात, अशी टिप्पणी फडणवीसांनी केली आहे. यासोबतच त्यांनी आपल्या करिअरबद्दलही चर्चा केली आहे. आर्थिक क्षेत्रात काम करणे ही माझी आवड होती. वकिली करणे हे माझे स्वप्न होते, पण ते स्वप्न भंगले आणि आता मी गेले २५ वर्षे विधानसभेत जनतेची वकिली करत आहे, असेही फडणवीस म्हणाले.