Maharashtra Assembly Election 2024: उमेदवारी नाकारली म्हणून प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. उमेदवारी अर्ज माघारीपर्यंत या बंडखोरांना आवर घालण्याचे मोठे आव्हान राजकीय पक्षांसमोर आहे.
पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपली. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ अर्ज दाखल झाले आहे. काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांची महाविकास आघाडी, भाजपच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती, या दोन आघाड्यांमुळे जागावाटपात मर्यादा आल्या. आघाडी आणि महायुतीला मित्रपक्षांना पुरेशा जागा देता आल्या नाहीत. त्यामुळे मित्रपक्षांनी आघाडी आणि महायुतीविरोधात बंडाचे निशाण हाती घेतले आहे. याशिवाय उमेदवारी नाकारली म्हणून प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. उमेदवारी अर्ज माघारीपर्यंत या बंडखोरांना आवर घालण्याचे मोठे आव्हान राजकीय पक्षांसमोर आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर मंगळवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक झाली. या बैठकीत बंडखोरांना शांत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार स्वतः मुख्यमंत्री शिंदे हे आपल्या पक्षातील बंडखोरांशी संवाद साधणार आहेत. भाजपकडून नेते विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बंडखोरांची समजूत काढणार आहेत. अजित पवार यांच्या पक्षाकडून प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे बंडखोरांशी चर्चा करणार आहेत.
‘महायुतीच सत्तेत येईल’
‘विधानसभा निवडणूक आव्हानात्मक आहे. पण, लोकसभेनंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. त्यामुळे विधानसभेत भाजप जागांचा १००चा आकडा पार करेल,’ असा दावा भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केला. विधानसभेच्या निकालानंतर बहुमतासाठी काही जागा कमी पडल्यास शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यापैकी कोणाची निवड करणार, या प्रश्नावर आम्ही महायुती म्हणून एकत्र असून, आमचेच सरकार येणार आहे, असे फडणवीस म्हणाले. संविधानाच्या नावाने ध्रुवीकरण करणारे संपले आहेत, अशी टीका त्यांनी काँग्रेसवर केली.
२८८ – विधानसभा मतदारसंघ
७९९५ – अर्ज भरलेले उमेदवार
१०, ९०५ – दाखल झालेले अर्ज