Maharashtra Assembly Election 2024: जिल्ह्यातील विद्यमान आमदार आणि या निवडणुकीतही पुन्हा रिंगणात असलेल्यांच्या कागदोपत्री संपत्तीची ही माहिती…
भुसेंपेक्षा पत्नीकडे जास्त संपत्ती
नाशिकचे पालकमंत्री तथा मालेगाव बाह्य मतदारसंघाचे आमदार दादा भुसे यांची एकूण जंगम मालमत्ता ३ कोटी ४१ लाख ४७ हजार ८२७ रुपये, तर त्यांच्या पत्नीकडे ३ कोटी ४९ लाख ३८ हजार २६४ रुपये इतकी आहे. भुसेंकडे एक लाख, तर त्यांच्या पत्नीकडे पाच लाचा रुपये रोख रक्कम आहे. बँक खात्यांत भुसेंकडे दोन कोटींहून अधिक, तर त्यांच्या पत्नीकडे एक कोटीहून अधिक रक्कम आहे. भुसेंकडे सव्वादोन लाखांचे, तर त्यांच्या पत्नीकडे सव्वापाच लाख रुपयांचे सोने आहे. भुसेंकडे सव्वा कोटी, तर त्यांच्या पत्नीकडे सव्वादहा कोटींची स्थावर मालमत्ता आहे. भुसेंवर पावणेदहा लाखांचे, तर त्यांच्या पत्नीपी १५ लाखांचे कर्ज आहे.
हिरेंच्या पतीकडे २२ कोटींची मालमत्ता
नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या हातात ४५ हजार नऊशे रुपये तर त्यांचे पती महेश हिरे यांच्या हातात ५४ हजार रुपयांची रोकड आहे. या दाम्पत्याकडे १६ लाख रुपये किमतीचे २०० ग्रॅम सोने आहे. आमदार हिरे यांच्याकडील एकूण स्थूल मूल्य ५४ लाख ४० हजार ९२६ रुपये, तर पती महेश यांच्याकडील एकूण स्थूल मूल्य ९७ लाख ६४ हजार ७५१ रुपये आहे. सीमा हिरे यांच्याकडे ५ कोटी ९१ लाख १६ हजारांची तर महेश हिरे यांच्याकडे २२ कोटी २५ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर कर्ज नसल्याचे हिरे यांनी विवरण पत्रात म्हटले आहे.
आहिरे दाम्पत्याकडे ७० लाखांचे सोने
देवळालीतून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणूक लढविणाऱ्या आमदार सरोज बाबूलाल आहिरे यांच्या नावावर १ कोटी ६४ लाख ३९ हजारांची, डॉक्टर पतीच्या नावावर १ कोटी १२ लाख ४७ हजारांची जंगम, तर दोघेमिळून ८८ लाख ९८ हजारांची स्थावर मालमत्ता आहे. आमदार आहिरेंचे सन २०१९-२० मध्ये २ लाख ९६ हजार रुपये असलेले उत्पन्न २०२३-२४ मध्ये ३९ लाख ८९ हजारांवर गेले आहे. या दाम्पत्याच्या हातात चार लाखांची रोकड असून, दोघांच्या ११ बँक खात्यांत ५८ लाख ३२ हजारांची रक्कम आहे. दोघांकडे ६९ लाखांचे सोने आहे. ४४ लाख ८४ हजारांचे कर्जही आहे.
कोकाटेंपेक्षा पत्नी श्रीमंत
विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पुन्हा रिंगणात आहेत. त्यांच्याकडे ७ कोटी ९२ लाख ८५ हजार १८२ रुपयांची जंगम मालमत्ता असून, त्यांच्या पत्नीकडे ९ कोटी ३८ हजार ५२ लाख ६५७ रुपयांची मालमत्ता आहे. कोकाटेंकडे साडेतेरा लाखांची रोख रक्कम आहे, तर त्यांच्या पत्नी अधिक श्रीमंत असून, त्यांच्याकडे सुमारे अठरा लाखांची रोख रक्कम आहे. कोकाटे दाम्पत्याकडे तीस कोटी रुपयांची एकूण स्थावर मालमत्ता असून, त्यांच्यावर सुमारे साडेसात कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.
आहेर दाम्पत्याकडे १८ कोटींची संपत्ती
चांदवड-देवळ्याचे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्याकडे नावे ६ कोटी ८० लाखांची जंगम मालमत्ता आहे, तर पत्नीच्या नावे २ कोटी ४७ लाखांची मालमत्ता आहे. डॉ. आहेर यांच्याकडे ४ कोटी २३ लाखांची, तर पत्नीकडे ३ कोटी ३४ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. आहेर यांच्याकडे १५ लाख ४० हजारांचे सोने आहे, तर पत्नीकडे १६ लाखांचे सोने आहे. आमदार महोदयांकडे तीन लाख रुपयांची रोख रक्कम आहे, तर त्यांच्या पत्नीकडे अवघ्या ५० हजार रोकड आहे.
ढिकलेंवर सव्वा कोटीचे कर्ज आमदार राहुल ढिकले यांच्याकडे ५८ लाख ७२ हजार, पत्नीकडे १७ लाखांची जंगम मालमत्ता आहे. राहुल यांच्याकडे ७ लाख १४ हजार रुपयांची रोख रक्कम शिल्लक असून, पत्नीकडे ९५ हजार आहेत. राहुल यांची स्थावर मालमत्ता ५ कोटी ८४ लाख १९ हजार रुपये इतकी असून, त्यांच्यावर १ कोटी २१ लाख २९ हजारांचे कर्ज आहे. राहुल यांच्याकडे ७ लाख ८० हजार रुपयांचे सोने असून, पत्नीकडे १५ लाख ६० हजार रुपयांचे दागिने आहेत.