Digital Arrest Fraud : मुंबईतील एका सरकारी रुग्णालयातील वरिष्ठ महिला डॉक्टरने ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये सुमारे सात कोटी गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
काय आहे प्रकरण?
महिला डॉक्टरने दिलेल्या तक्रारीनुसार घटना जुलै महिन्यातील आहे. रुग्णालयात असताना महिला डॉक्टरच्या मोबाइलवर एक इंटरएक्टिव व्हॉईस रिस्पान्स कॉल आला. तो घेताच समोरील व्यक्तीने आपल्या सीम कार्डचा वापर गुन्ह्यांसाठी करण्यात आला असून या कार्डची सेवा बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले. अधिक माहितीसाठी ९ क्रमांकाचे बटन दाबण्यास सांगितले. हे बटण दाबताच समोरून कुलाबा पोलिस ठाण्यातून निरीक्षक विजय खन्ना बोलत असल्याचे सांगितले. आपले सीम कार्ड आणि आधार कार्ड याचा गैरवापर करण्यात आला असून मनी लॉन्डरिंगच्या गुन्ह्यातील पैसे आपल्या खात्यामध्ये आल्याचा संशय आहे. त्यामुळे तुम्हाला कुलाबा पोलिस ठाण्यात चौकशीसाठी यावे लागेल असे सांगण्यात आले. यावर डॉक्टरने वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवते आणि येते अशी माहिती दिली. यावर या अधिकाऱ्याने कुणाला सांगायची गरज नाही तुम्ही घरी जा आणि नंतर काय करायचे ते कळवतो असे सांगितले.
महिला डॉक्टरला घरी पोहोचताच स्काइपच्या माध्यमातून व्हिडीओ कॉल आला. सीबीआयमधून राहुल गुप्ता बोलत असल्याचे समोरील व्यक्तीने सांगितले. त्याने एक एफआयआरची प्रत आणि सीबीआयच्या लेटरहेडवरील एक पत्र पाठविले. हे पाहून डॉक्टरला धक्काच बसला. आपण ‘डिजिटल अरेस्ट’ आहात असे समजा आणि सहकार्य करा, असे गुप्ता म्हणाला. सहकार्य न केल्यास घरी अधिकारी पाठवून अटक केली जाईल, असे धमकाविण्यात आले. त्यानंतर व्हिडीओ कॉल रात्रभर सुरूच ठेवण्यात आला.
‘डिजिटल’ खटला
तोतया सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीला व्हिडीओ कॉलवर जोडून न्यायाधीश असल्याचे भासविले. त्यांच्यासमोर डॉक्टरवर खटला चालविण्यात आला. कुठेही जायचे असेल तर परवानगी घेण्यास तसेच बँक खात्याचा तपशील देण्यास सांगण्यात आले. आमचे अधिकारी तुमच्यावर लक्ष ठेवून असल्याचे भासविले गेले.
दीड महिन्यात खाते रिकामी
कधी बँक खात्यावर परस्पर पैसे वळते करून तर कधी अटकेची धमकी दाखवून सुमारे दीड महिन्यांच्या कालावधीत तोतया अधिकाऱ्यांनी महिला डॉक्टरकडून सहा कोटी ९३ लाख रुपये उकळले. पैशाची मागणी सुरूच राहिल्याने डॉक्टरला संशय आला आणि म्हणून डॉक्टरने डिजिटल अरेस्टबाबत इंटरनेटवर शोध घेतला. त्यावेळी हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आले.