दिलीप वळसे पाटील यांना पद, पाठिंबा आणि संधी दिली असतानाही त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याचं म्हणत शरद पवारांनी नाव न घेता जोरदार टीका केली. आंबेगावच्या सहकाऱ्याला सोबत घेत विश्वास दाखवला पण त्यांनी गैरफायदा घेतल्याचं शरद पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले, निवडणुकीसंबंधी लोकांच्यात उत्साह पाहायला मिळत आहे. आपण मविआच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहोत. आपल्यासमोर असलेल्या दुसऱ्या शक्तीला मोदींचा पाठींबा आहे. त्यांच्याकडे सत्ता आहे. सत्तेच्या जोरावर तुम्हा लोकांना वेगळ्या ठिकाणी नेऊ शकतो असा त्यांना विश्वास आहे. मागची परिस्थिती वेगळी होती. आपण एकत्र होतो. आपण एकत्रित सत्ता स्थापन केली. बारामती, आंबेगावला मंत्री पद दिले. इंदापूरला राज्यमंत्री पद दिले. जिल्ह्याला तीन मंत्री दिले. या आधी कधी जिल्ह्याला एवढी पदे मिळाली नव्हती. अपेक्षा होती की जिल्ह्याकडे लक्ष दिले जाईल. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक होईल. सत्ता आणण्यासाठी तुम्हा कार्यकर्त्यांनी कष्ट केले. त्याची आठवण या सहकाऱ्यांना झाली नाही. आपले काहीजण दुसऱ्या पक्षाला मिळाले. या आधी सत्ता मिळाली तेव्हा आंबेगावच्या सहकाऱ्याला त्यात आपण सामिल केले. पण प्रतिनिधीच दुसऱ्या पक्षाकडे गेल्याचं म्हणत पवारांनी पाटलांवर हल्लाबोल केला.
मी केंद्रात होतो, त्यामुळे राज्यात लक्ष देणे शक्य नव्हते. परिणामी राज्याची जबाबदारी काही लोकांवर सोपवली. विश्वासाने जबाबदारी दिली पण दुर्देवाने त्यांनी वेगळा विचार केला, गैरफायदा घेतला. लोकांना स्वप्नातही वाटले नव्हते ते या लोकांकडून घडल्याचं पवार म्हणाले. मंत्री वळसे पाटील यांचा नामोल्लेख न करता पवार म्हणाले, त्यांच्या वडिलांनी मला सांगितले, माझा मुलगा मुंबईत शिकतोय, त्याला तुमच्या सोबत घेता आले तर घ्या. मी सहकाऱ्याच्या मुलाला सोबत घेतले, त्यांना ताकद दिली. काही महत्त्वाच्या पदांवर संधी दिली. रयतसह वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये घेतले. देशाच्या साखर कारखान्याचे अध्यक्षपद दिले. विश्वासातील लोक असावेत ही भावना त्यामागे होते. पण त्यांनी वेगळा निर्णय घेतला. सत्ता कायम टिकत नसते. सत्तेपेक्षा सत्तेवर बसवणारा सामान्य माणूस महत्त्वाचा असतो. जे झाले त्याचा विचार करायचा नाही. आता वेळ आली असून आंबेगावच्या जनतेवर माझा विश्वास असल्याचे पवार म्हणाले.