Sugarcane Workers Drowned River : यवतमाळमधील ऊसतोड कामगारांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिवाळीच्या दिवशी घडलेल्या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
२५ वर्षीय चौघांचा मृत्यू
शंकर विनोद शिवणकर (वय २५), प्रकाश धाबेकर (वय २६), अजय महादेव मंगाम (वय २५), राजीव रामभाऊ गेडाम (वय २६) सर्व रा. लसणा टेकडी ता. जि. यवतमाळ अशी बुडालेल्या ऊसतोड कामगारांची नावं आहेत. ऐन दिवाळीत ऊसतोड कामगारांसोबत घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सोलापूर जिल्हा हादरला आहे.
अंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेले
ऊसतोड कामगारांचा गट जगदाळे वस्ती, खैराव (ता. माढा) येथे आली होती. गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सीना नदीवर चौघे जण आंघोळीसाठी आणि कपडे धुण्यासाठी गेले होते. पहिल्यांदा शंकर हा पाण्यात गेल्यावर बुडायला लागला. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी प्रकाश पाण्यात उतरला. शंकर आणि प्रकाश दोघंही पाण्यात बुडू लागल्याने अजय आणि राजीव हे दोघेही पाण्यात उतरले. नदीतील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने चौघेही पाण्यात बुडाले. घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले आहे. दोन तासानंतरही चौघांचा शोध सुरुच आहे.
एकाच वेळी ४ ऊसतोड कामगारांना जलसमाधी, ऐन दिवाळीत कुटुंबावर दु:खाचा डोंगर; काय घडलं?
दिवाळीला दुचाकीवरुन घरी जाणाऱ्या शेतकऱ्यांचं निधन
दरम्यान, सोलापुरात दिवाळीची खरेदी करून घरी जाणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरुन गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रुपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरुन येणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे, तर चालक जखमी झाला आहे. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. प्रकाश भानुदास जाधव (वय ५०, रा. कासेगाव, ता. दक्षिण सोलापूर) असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.