Nawab Malik: विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसं झाल्यास अजित पवारांची भूमिका महत्त्वाची असेल, असं भाकीत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी वर्तवलं.
नवाब मलिक अणुशक्तीनगरमधून लढत आलेले आहेत. यंदा त्यांनी ती जागा कन्येसाठी सोडली. मलिक शिवाजीनगर मतदारसंघातून लढत आहेत. यंदाच्या निवडणुकीचा कौल कोणाच्या बाजूनं लागेल, या प्रश्नाचं उत्तर देताना मलिक यांनी २०१९ नंतर राज्यात घडलेल्या घडामोडींचा संदर्भ दिला. ‘२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. तसा अंदाज कोणीही बांधलेला नव्हता. कोणी तसा विचारही केलेला नव्हता. आता काहीही होऊ शकतं. कोणी कोणाचा कायमचा शत्रू नाही आणि मित्रही नाही. गोष्टी बदलत आहेत. २०१९ पासून आपण त्या पाहिल्या आहेत,’ असं मलिक यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
राज्यात कोणालाही बहुमत न मिळाल्यास, त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास अजित पवारांची सत्ता स्थापनेतील भूमिका महत्त्वाची असेल, असं भाकित मलिक यांनी वर्तवलं. ‘विधानसभेची निवडणूक अवघड आहे. अगदी काँटे की टक्कर आहे. सामना अटीतटीचा आहे. अजित पवारांशिवाय सरकार स्थापन होईल, असं कोणीही म्हणू शकत नाही. त्यामुळे अजित पवारांची भूमिका महत्त्वाची असेल. त्यावेळी तेदेखील त्यांच्या अटी पुढे ठेवतील,’ असं सूचक विधान मलिक यांनी केलं.
२०१९ पासून राज्यात अभूतपूर्व घडामोडी घडल्या आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपनं १०५ जागा जिंकल्या. अन्य कोणत्याही पक्षाला ६० चा आकडा गाठता आला नाही. पण मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरुन शिवसेनेची भाजपसोबतची युती तुटली. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीशी घरोबा केला आणि महाविकास आघाडी स्थापन झाली. ५६ आमदार असलेल्या सेनेकडे मुख्यमंत्रिपद गेलं.
Nawab Malik: त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास अजितदादा…; मलिकांचं महत्त्वाचं भाकीत, NCP कोणत्या विचारात?
जून २०२२ मध्ये शिवसेनेत अभूतपूर्व बंड झालं. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात ४० आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली. त्यामुळे ठाकरे सरकार कोसळलं. शिंदेंनी भाजप सोबत जात सत्ता स्थापन केली. नव्या सरकारमध्ये शिंदे मुख्यमंत्री झाले. सेनेचे ४० आमदार आणि काही अपक्ष आमदारांच्या जोरावर त्यांनी मुख्यमंत्रिपद मिळवलं. त्यामुळे १०० हून अधिक आमदार असणारा भाजप ५ वर्षे मुख्यमंत्रिपदापासून दूरच राहिला.