Eknath Shinde: गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या घडामोडी आताही घडत आहेत. सेनेत निवडणुकीच्या तोंडावर दाखल झालेले नेते भाजप नेतृत्त्वाच्या थेट संपर्कातील आहेत.
ठाकरेंसोबत काय घडलं?
२०१९ मध्ये राज्यात भाजप, शिवसेना युतीची हवा होती. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते, आमदार यांनी युतीत जाण्याचे प्रयत्न सुरु केले. यातील अनेकांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. ज्या जागा भाजपकडे होत्या, त्या जागांवर फडणवीसांनी आघाडीतील नेत्यांचे पक्षप्रवेश करुन घेतले. तर ज्या जागा युतीत शिवसेना लढते, तिथल्या नेत्यांना फडणवीसांनी सेनेत पाठवलं. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार या नेत्यांपैकी ठळक नाव म्हणता येईल. ते पुढे मंत्री झाले. २०१५ मध्ये शिवसेनेत गेलेल्या आणि मग पुढे मंत्री झालेल्या तानाजी सावंत यांचा प्रवास राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुरु झाला.
बंड, बैठका अन् पाठिंबा
फडणवीस यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते गेल्या विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेत पाठवले. ही माणसं उद्धव ठाकरेंपेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या अधिक जवळची होती, आहेत. त्यांचा फायदा भाजपला ठाकरेंचं सरकार पाडताना झालं. शिंदे यांनी बंड करताच फडणवीस यांच्याशी अधिक सलगी असलेल्या नेत्यांनी, मंत्र्यांनी आधी शिंदेंच्या जहाजात उड्या मारल्या. ठाकरे सरकार पाडण्यासाठी १५० बैठका घेतल्या होत्या. त्यात शिंदे, फडणवीस होते, असा गौप्यस्फोट मार्च २०२३ मध्ये खुद्द सावंत यांनीच केला आहे.
केवळ तिकिटासाठी कमळ सोडणारे शिलेदार
आता यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या राज्य नेतृत्त्वानं शिंदेंना ८० जागा सोडल्या आहेत. पण यातील १२ नेते केवळ तिकिटासाठी शिंदेंकडे गेलेले आहेत. त्यात शायना एनसी (मुंबादेवी), निलेश राणे (कुडाळ), मुरजी पटेल (अंधेरी पूर्व), अमोल खताळ (संगमनेर), अजित पिंगळे (धाराशिव), दिग्विजय बागल (करमाळा), विठ्ठल लंघे (नेवासा), बळीराम शिरसकर (बाळापूर), विलास तरे (बोईसर), संतोष शेट्टी (भिवंडी पूर्व), राजेंद्र गावित (पालघर), संजना जाधव (कन्नड) यांचा समावेश आहे.
Eknath Shinde: जे ठाकरेंबरोबर केलं, तेच आता शिंदेंसोबत; भाजपनं गळ टाकलाय, ‘ती’ फौज गेम करणार?
…तर करेक्ट कार्यक्रम होणार?
यंदाची विधानसभा निवडणूक अभूतपूर्व आहे. निकालानंतर महायुती सत्तेपासून दूर राहिल्यास, शिंदेसेनेनं चांगल्या जागा निवडून आणल्यास त्यांच्यापुढे विविध पर्याय खुले असतील. त्या परिस्थितीत शिंदेंनी वेगळा विचार केल्यास त्यांच्याकडे असलेल्या १२ जणांची भूमिका महत्त्वाची असेल. यातील काही जण निवडून येतील. शिंदेंनी वेगळा विचार केल्यास या पेरलेल्या नेत्यांच्या मदतीनं गेम केला जाऊ शकतो. यातील एखाद्या नेत्यानं तानाजी सावंत यांच्याप्रमाणे बैठका घेतल्यास राजकारणाला कलाटणी मिळू शकते आणि भाजपकडून करेक्ट कार्यक्रम केला जाऊ शकतो. तानाजी सावंत, अब्दुल सत्तार हे नेते अन्य पक्षातून सेनेत गेले होते. पण वर उल्लेख केलेले १२ नेते तर थेट भाजपनंच सेनेत पाठवले आहेत, ही बाब इथे दुर्लक्ष करुन चालत नाही.